छगन भुजबळ यांनी शिवसेना प्रवेशाचे फेटाळले वृत्त; आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याची माहिती
Chhagan Bhujbal | (Photo Credits: Facebook )

लोकसभेसाठी भाजपने (BJP) तोडाफोडीचे राजकारण केले होते मात्र आता विधानसभेवेळी (Maharashtra Assembly Election 2019) स्वतःहून आमदार, खासदार भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. यासाठी गेल्या काही दिवसांमध्ये अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादीला रामराम केला आहे. यामध्ये अजून एका नावाची भर पडली होती ती म्हणजे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal). छगन बुजबळ राष्ट्रवादी सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्यांनी जोर धरला होता. मात्र त्यामध्ये काही तथ्य नसल्याचे समोर येत आहेत. स्वतः छगन भुजबळ यांनी यावर प्रकाश टाकला आहे.

विधानसभा निवडणुकांसाठी आता सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेना-भाजप यांनी जागावाटपाच्या बैठकाही सुरु केल्या आहेत. राष्ट्रवादी-कॉंग्रेसनेही आपली रणनीती ठरवण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस पक्षातील जवळजवळ सर्व मान्यवर उपस्थित होते, यामध्ये छगन भुजबळही सामील झाले. छगन भुजबळ यांना या बैठकीस पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यावर भुजबळ यांनी स्वतः शिवसेना प्रवेशाचे वृत्त फेटाळून लावले व आपण साहेबांसोबतच असल्याचे सांगितले. (हेही वाचा: छगन भुजबळ यांना शिवसेनेत एन्ट्री नाही, उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आश्वासन)

'मी राष्ट्रवादीतच आहे, मी साहेबांसोबतच आहे आणि आज बैठकीला आलोय. वावड्या उठवण्याचे काम माध्यमे करत असतात.’ अशा शब्दांत त्यांनी आपले मत व्यक्त केले. यावर आता छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी-कॉंग्रेसची आपल्या महत्वाच्या नेत्यांसोबत एक बैठक चालू आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या या बैठकीस अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ आदि नेते उपस्थित आहेत.

दरम्यान, सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावेळीही छगन भुजबळ शिवसेनेमध्ये जाणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपण राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते.