
निधी गोळा करणे, पक्षाचे फलग, बॅनर उभारणे, ते जपून ठेवणे, पक्षाचा विचार तळागाळात पोहोचवणे या गोष्टी पक्षकार्य या चौकटीत बसतात. पण, चक्क पक्षाचे कार्यालय चालवण्यासाठी वीज चोरणे हे पक्षकार्यात बसू शकते काय? अर्थातच नाही. पण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) विधानसभा युवक अध्यक्ष हारुन खान यांनी हे पक्षकार्यात बसवले आहे. अर्थात त्यांच्या चुकीचा दणका त्यांना बसला आहे. भीवंडी पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत खान यांना अटक केली आहे.
हारुन खान यांनी न्यू कणेरी येथील पक्ष कार्यालयासाठी वीज चोरी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी पक्ष कार्यालयात अधिकृत वीज जोडणी करुन वीज घेतली नाही. तर, थेट मीटर नसलेलीच वीज जोडणी वापरली. आतापर्यंत त्यांनी तब्बल 90 हजार रुपयांची वीज चोरी (Electricity Theft) केली आहे. ही माहिती प्रशासनास कळताच प्रशासनाकडून या कृत्याबद्दल दंड आकारण्यात आला. मात्र, खान यांनी दंड भरला नाही. परीणामी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: आघाडीचं ठरलं, युतीचं काय? राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस मिशन ट्वेंटी-20, शिवसेना-भाजप गुलदस्त्यात)
प्राप्त माहितीनुसार, हारुन खान यांच्या विरोधात भिवंडी (Bhiwandi) शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. टोरंट पॉवर कंपनीने दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हारुन खान यांचे अनोखे पक्षकार्य सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.