पुण्यामध्ये 'चंपा साडी सेंटर'चे उद्घाटन करत राष्ट्रवादीने केले आंदोलन; पहा व्हिडीओ
राष्ट्रवादीचे आंदोलन (Photo Credit : Youtube)

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर, आपल्या मतदारसंघात आपण भाऊबीजेच्या (Bhaubeej) दिवशी साड्यांचे वाटप करणार असल्याचे सांगितले होते. या उपक्रमाला अनेक लोकांचा, पक्षांचा विरोध होता. अखेर हा विरोध झुगारून चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातील महिलांना साड्यांचे वाटप केलेच. या विरोधात आज राष्ट्रवादीने ‘चंपा साडी सेंटर’द्वारे नवे आंदोलन छेडले. भाऊबीज म्हणून कोथरूडच्या आर्थिक मागास वर्गातील महिलांना चंद्रकांत पाटील यांनी साड्या वाटल्या. त्या बाबत बुधवारी सकाळी डेक्कन येथील खंडोजी बाबा चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

लोकसत्ताने प्रसिद्ध केलेला व्हिडीओ -

पुण्यातील डेक्कन येथील खंडोजी बाबा चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आणि आमदार चेतन तुपे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह हे आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीकडून प्रतिकात्मक चंपा साडी सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. सोबत ‘भूखंडचा भ्रष्टाचार करून बक्कळ पैसे कमावणार व पुढची पाच वर्षे पुण्याला भरपूर लुटणार’ असा संदेश असणारा फलकही झळकवण्यात आला. चिडलेल्या कार्यकर्त्यांनी ‘कोल्हापूरचा गडी पुण्यात वाटतोय फाटकी साडी, आम्हाला हवी विकासाची गाडी, आम्हाला नको चंपा साडी’ अशा घोषणाही दिल्या गेल्या. (हेही वाचा: कोथरूड: अनेक पक्षांकडून होत असलेला विरोध झुगारून चंद्रकांत पाटील यांनी भाऊबीजेनिमित्त केले साड्यांचे वाटप (Video))

दरम्यान, कोथरूड मतदारसंघातील 1 लाख महिलांना साड्या वाटपाचा उपक्रम चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवला होता. त्याला सर्वच स्तरातून प्रचंड विरिध झाला. मुख्यत्वे मनसेने एक पत्रक काढून या उपक्रमाला असलेला विरोध दर्शवला.  त्यानंतर आपनेही या उपक्रमाचा निषेध केला. अशा प्रकारे साड्या वाटणे हे आचारसंहिता भंगाचे उदाहरण असल्याचे मनसेने म्हटले होते. निवडणुकीपूर्वी साड्या वाटा अथवा नंतर वाटा दोन्ही गोष्टी एकच आहेत असे सांगून या गोष्टीची दाखल घ्यावी अशी मागणीही मनसेने केली होती.