भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना कोथरूड (Kothrud) येथून उमेदवारी देण्यापासूनच वादाला ठिणगी पडली होती. आता त्यामध्ये आणखीनच भर पडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर आपल्या मतदारसंघात आपण भाऊबीजेच्या (Bhaubeej) दिवशी साड्यांचे वाटप करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. या उपक्रमाला अनेक लोकांचा, पक्षांचा विरोध होता. अखेर हा विरोध झुगारून चंद्रकांत पाटील यांनी आज कोथरूड मतदारसंघातील महिलांना साड्यांचे वाटप केलेच. मनसेचे कोथरूड विभागाचे अध्यक्ष सुधीर धावडे यांनी याबाबत प्रचंड विरोध दर्शवला होता. मात्र कोथरूड मतदारसंघातील महिलांना आज साड्यांचे वाटप करण्यात आले.
कोथरूड मतदारसंघातील 1 लाख महिलांना साड्या वाटपाचा उपक्रम चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवला होता. त्याला सर्वच स्तरातून प्रचंड विरिध झाला. मुख्यत्वे मनसेने एक पत्रक काढून या उपक्रमाला असलेला विरोध दर्शवला. त्यानंतर आपनेही या उपक्रमाचा निषेध केला. अशा प्रकारे साड्या वाटणे हे आचारसंहिता भंगाचे उदाहरण असल्याचे मनसेने म्हटले होते. निवडणुकीपूर्वी साड्या वाटा अथवा नंतर वाटा दोन्ही गोष्टी एकच आहेत असे सांगून या गोष्टीची दाखल घ्यावी अशी मागणीही मनसेने केली होती.
या घटनेचा सकाळने प्रसिद्ध केलेला व्हिडीओ -
भाऊबीज म्हणून कोथरूडच्या आर्थिक मागास वर्गातील महिलांना चंद्रकांत पाटील यांनी आज साड्या वाटल्या.कोथरूडमध्ये 24 पैकी 18 नगरसेवक भाजपचे आहेत. पैकी अमोल बालवडकर यांनी आज महिलांना साड्या वाटप केले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. निवडणुकीच्या आधीपासूनच साडी वाटपाचा मुद्दा गाजत आहे. याच मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांची निवडणूक रद्द व्हावी अशी मागणीही मनसेने केली होती.