राष्ट्रवादी काँग्रेस (Photo Credits-Facebook)

देशासह महाराष्ट्रातही (Maharashtra) कोरोना विषाणूने (Coronavirus) हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई आणि पुणे येथे आढळून आले आहेत. सर्वसामान्य, कलाकारांसह अनेक राजकीय नेते कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर जुन्नर नगरपरिषदेतील राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान नगरसेवक दिनेश भैया दुबे (Dinesh Dubey) यांचा आज पहाटे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दिनेश दुबे यांच्या निधनाने जुन्नर शहरावर शोककळा पसरली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

दिनेश दुबे हे जुन्नर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष होते. ते विद्यमान नगरसेवक असून राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते म्हणूनही कार्यरत होते. दिनेश दुबे यांना गेल्या काही दिवसांपासून अशक्तपणा जाणवत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली होती. त्यावेळी त्यांना कोरोना झाल्याचे निषप्न झाले होते. त्यानंतर कोरोनावरील उपचार घेण्यासाठी त्यांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक लढवय्या नेता कोरोनाच्या लढाईत बळी पडल्याची हळहळ जुन्नरमध्ये व्यक्त होत आहे. हे देखील वाचा- COVID19 Cases In Pune: पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी वाढ; जिल्ह्यात आज 1 हजार 838 रुग्णांची नोंद, 18 जणांचा मृत्यू

याआधी, पुण्यातील अनेक लोकप्रतिनिधींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचेही कोरोनामुळे निधन झाले. महाराष्ट्रातील सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या यादीत मुंबई पाठोपाठ पुण्याचा नंबर लागत आहे. ज्यामुळे पुण्यातील नागरिकांच्या मनात घबराट पसरली आहे.