Ncp Chief Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

लोकसाभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) मध्ये भाजप (BJP) आणि एनडीए (NDA) मोठ्या मताधिक्याने आणि बहुमताने सत्तेत आली. त्यानंतर काँग्रेस (Congress)आणि युपीएतील सर्वच घटक पक्षांनी आत्मपरिक्षण करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचा मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) हासुद्धा आत्मपरीक्षण करत आहे. दरम्यान, हे आत्मपरीक्षण करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंसेवकाच्या चिकाटीचे कौतुक केले आहे. इतकेच नव्हे तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शिका असा संदेशही त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला. पिंपरी-चिंचवड (PawarPimpri Chinchwad) येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार गुरुवारी बोलत होते.

काय म्हणाले शरद पवार?

या वेळी बोलताना शरद पवार म्हणाले, संघाशी आपले मतभेद आहेत. त्यांच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला पटत नाहीत. पण, जे चांगलं आहे ते आपण घेतलं पाहिजे. भाजपला यश मिळण्याचं कारण विचारले असता एका भाजप खासदारानेच आपल्याला ही माहिती दिली, असंही पवार या वेळी सांगितले. दरम्यान ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कसा प्रचार करतात, हे लक्षात घ्या. पाच घरांमध्ये भेटायला गेले आणि यातील एक घर बंद असेल तर ते संध्याकाळी पुन्हा त्या बंद घरात जातात. संध्याकाळीही ते घर बंद असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्या घरात जातात, पण काहीही झालं तरी ते त्या घरातील सदस्यांशी संपर्क साधतातच. ही चिकाटी आपल्या कार्यकर्त्यांनीही शिकावी,'' असंही पवार या वेळी म्हणाले. (हेही वाचा, राष्ट्रवादी काँग्रेस - राष्ट्रीय काँग्रेस विलिनीकरणाबाबत राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा नाही: शरद पवार)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानेही आपापल्या भागातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधायला पाहिजे. घरोघरी जाऊन मतदारांकडून सविस्तर माहिती घ्यायला पाहिजे. ज्यामुळे मतदारांना पक्षापद्दल आपलेपणा वाटेल. तसेच, मतदारही निवडणुकीतच तुम्हाला आमची आठवण येते का? असे विचारणार नाही, असेही पवार म्हणाले.