राष्ट्रवादी काँग्रेस - राष्ट्रीय काँग्रेस विलिनीकरणाबाबत राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा नाही: शरद पवार
शरद पवार (Photo Credits: ANI)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलिन करण्याबाबत राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चर्चा झाली नसल्याचे पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. शरद पवार आणि राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांच्यात राजधानी दिल्ली येथे  आज (गुरुवार, 30 मे 2019) बंद दाराआड 'वन टू वन' चर्चा झाली. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेस (National Congress)  पक्षात विलीन होणार असल्याबाबतची शक्यता वर्तवणारे वृत्त प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाले या पार्श्वभूमीवर शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या वेळी बोलताना, पवार यांना राज्यसभेतील विरोधी नेतेपद देण्याबाबत चर्चा आहे, असे विचारले असता कदाचित त्यांच्याकडे (काँग्रेस) नेतृत्वाची कमतरता भासत असावी त्यामुळेच त्यांनी विचारणा केली असावी, अशी सूचीट टीपण्णी शरद पवार यांनी केली. मात्र, शरद पवार यांनी विलिनीकरणाची शक्यता फेटाळून लावली असली तरी, प्रसारमाध्यमांनी मात्र या विषयी गंभीरपणे चर्चा सुरु केली आहे.  (हेही वाचा, राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विलीन होणार? शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात बंद दाराआड 'वन टू वन' चर्चा)

दरम्यान, लोकसभा निवडणूक 2019 नंतर राष्ट्रीय राजकारणात प्रचंड मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. या निवडणुकीत प्रचंड मोठ्या जनमताच्या जोरावर भारतीय जनता पक्षाने सत्तेत मुसंडी मारली. तर, त्या उलट राष्ट्रीय काँग्रेसची प्रचंड मोठी पिछेहाट झाली. या पार्श्वभूमिवर भाजपला रोखण्यासाठी आणि काँग्रेसचे संसदेतील स्थान कायम ठेवण्यासाठी काँग्रेसच्या गोटात जोरदार विचारमंथन सुरु आहे. या पार्श्वभूमिवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बंद दाराआड वन टू वन चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूकीत झालेल्या दारूण पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतही त्यांनी हा विचार बोलून दाखवला. मात्र, कार्यकारिणीने त्याला विरोध करत राहुल गांधी यांचा राजीनामा फेटळाला. असे असले तरी, राहुल गांधी हे आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यामुळे काँग्रेस सध्या नव्या अध्यक्षाच्या शोधात असल्याचेही राजकीय विश्लेषक सांगतात.

दरम्यान, स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीवर भाजपचा विजयी वारु रोखण्यासाठी काय करायला हवे. याबाबत काँग्रेस आणि समविचारी पक्षांमध्ये जोरदार विचारविनीमय सुरु आहे. ही पार्श्वभूमी विचारात घेतली तरी, लगेच राष्ट्रीय काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होऊ शकेल, असा अर्थ लावणे चुकीचे असल्याचे सांगत ही शक्यता राजकीय विश्लेषकांनी फेटाळून लावली आहे.