
महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाला कलाटणी मिळू शकेल असे खळबळजनक वृत्त राजधानी दिल्लीतून येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawa) यांच्यात आज (गुरुवार, 30 मे 2019) बंद दाराआड 'वन टू वन' चर्चा झाली. या चर्चेचा तपशील पूर्णपणे बाहेर आला नाही. मात्र, या चर्चेला केंद्रस्थानी ठेऊन एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) राष्ट्रीय काँग्रेस (Congress Party) पक्षात विलीन होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अर्थात या शक्यतेला काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृतपणे दुजोरा मिळू शकला नाही.
लोकसभा निवडणूक 2019 नंतर राष्ट्रीय राजकारणात प्रचंड मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. या निवडणुकीत प्रचंड मोठ्या जनमताच्या जोरावर भारतीय जनता पक्षाने सत्तेत मुसंडी मारली. तर, त्या उलट राष्ट्रीय काँग्रेसची प्रचंड मोठी पिछेहाट झाली. या पार्श्वभूमिवर भाजपला रोखण्यासाठी आणि काँग्रेसचे संसदेतील स्थान कायम ठेवण्यासाठी काँग्रेसच्या गोटात जोरदार विचारमंथन सुरु आहे. या पार्श्वभूमिवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बंद दाराआड वन टू वन चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणूकीत झालेल्या दारूण पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतही त्यांनी हा विचार बोलून दाखवला. मात्र, कार्यकारिणीने त्याला विरोध करत राहुल गांधी यांचा राजीनामा फेटळाला. असे असले तरी, राहुल गांधी हे आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यामुळे काँग्रेस सध्या नव्या अध्यक्षाच्या शोधात असल्याचेही राजकीय विश्लेषक सांगतात.
दरम्यान, स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीवर भाजपचा विजयी वारु रोखण्यासाठी काय करायला हवे. याबाबत काँग्रेस आणि समविचारी पक्षांमध्ये जोरदार विचारविनीमय सुरु आहे. ही पार्श्वभूमी विचारात घेतली तरी, लगेच राष्ट्रीय काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होऊ शकेल, असा अर्थ लावणे चुकीचे असल्याचे सांगत ही शक्यता राजकीय विश्लेषकांनी फेटाळून लावली आहे.