BJP-Shiv Sena Political Battle For Power: भाजप-शिवसेना (BJP-Shiv Sena) यांच्यातील सत्तावाटपाचं भांडण थांबण्याचे नाव घेत नसल्याने हा तिढा आणखी किती दिवस राहणार अशी उत्सुकता असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राजकीय प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, “विधीमंडळामध्ये विश्वास ठरावानंतर भाजपाचे सरकार कोसळले तर राष्ट्रवादी पर्यायी सरकारचा विचार करेल.”पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक मुंबईत आज (बुधवार, 30 ऑक्टोबर 2019) पार पडली. या बैठकीनंतर आमदार मलीक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात एकूण 288 जागांपैकी शिवसेना ही 124 तर भाजप हा 164 जागांवर लढत होता. उर्वरीत जागांव युतीचे मित्रपक्ष लढत होते. तर, दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष आघाडी करुन लढत आहेत. काँग्रेस 147 तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 124 जागा लढवल्या. त्यापैकी भाजप 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 54 , काँग्रेस 44 आणि इतर पक्षांना 29 जागा मिळाल्या. त्यामुळे जनतेने कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही हे स्पष्ट होते. या पार्श्वभूमिवर सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष म्हणून भाजपलाच सरकार स्थापनेसाठी प्रथम पुढाकार घ्यावा लागणार आहे. हा पुढाकार घेताना 145 हा बहुमताचा जादूई आकडा गाठायचा असेल तर शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय भाजपला गत्यंतर नाही. (हेही वाचा, 'आमचं ठरलंय' ते आमचं तुटतंय? भाजपच्या फुग्याला शिवसेनेची टाचणी? काँग्रेस, राष्ट्रवादी पाहतंय दुरुन मजा)
भाजपची गरज पाहून शिवसेनेच्याही राजकीय महत्त्वाकांक्षा चांगल्याच पल्लवीत झाल्या आहेत. नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये शिवसेनेला भाजपच्या बरोबरीने सत्ता हवी आहे. त्यात मुख्यमंत्रीपद हा कळीचा मुद्दा आहे. मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना सुरुवातीपासूनच आग्रही आहे. मात्र, मुख्यमंत्री पद देण्यास भाजपने ठाम नकार दिला आहे. तसेच, युतीच्या बोलण्यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद या दोन्हीचाही उल्लेख नव्हता, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसोबतच्या अनौपचारीक चर्चेत सांगून टाकले. त्यामुळे शिवेसना चांगलीच दुखावली गेली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदावरुन जोरदार वाद रंगला आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमिवर राष्ट्रवदी काँग्रेस पक्ष आमदार नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षात बसण्यासाठी जनमताने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापन करावी. पण, विश्वासदर्शक ठरावावेळी शिवसेनेने भाजप विरोधात भूमिका घेतली आणि अल्पमतात येऊन सरकार पडले तर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायी सरकारसाठी विचार करेन, असेही मलिक यांनी म्हटले आहे. त्यामुळे मलिक यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष मिळून सत्ता स्थापन करणार की काय, अशी चर्चा सुरु झाली आहे.