राज्यात क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरण (Cruise Drug Party Case) चांगलेच तापले आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) करत असलेल्या टीकेबाबात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना विचारले असता "नबाव मलिक यांच्यासारख्या लोकांना मी खिशात ठेवतो," असं ते म्हणाले. पाटील यांच्या या वक्तव्यावर मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "ते मला कधी खिशात टाकत आहेत याची मी वाट बघतोय मग त्यांच्या खिशात काय काय आहे हे मी जनतेसमोर आणणार आहे," असं मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांचा त्या वक्तव्याचा व्हिडिओ ट्विट करत म्हटलं आहे.
"भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगत आहेत मी नवाब मलिक यांना खिशात ठेवतो. त्यांचा खिसा इतका मोठा आहे हे मला माहीत नाही. मी वाट बघतोय ते कधी त्यांच्या खिशात टाकत आहेत. मी त्यांच्या खिशात काय काय आहे हे जनतेसमोर आणणार आहे त्यासाठी चंद्रकांतजी मला तुमच्या खिशात टाका," असं मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Nawab Malik Tweet:
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगत आहेत मी नवाब मलिक यांना खिशात ठेवतो. त्यांचा खिसा इतका मोठा आहे हे मला माहीत नाही. मी वाट बघतोय ते कधी त्यांच्या खिशात टाकत आहेत. मी त्यांच्या खिशात काय काय आहे हे जनतेसमोर आणणार आहे त्यासाठी चंद्रकांतजी मला तुमच्या खिशात टाका. (1/2) pic.twitter.com/aMZU3VM6sN
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 31, 2021
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर धनंजय मुंडे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. पाटील यांना अशी भाषा शोभत नाही. चंद्रकांत पाटील किंवा भाजपच्या कुठल्याच राज्य वा केंद्रातील नेत्यांचे खिसे इतके मोठे नाहीत. त्यांनी आपली मर्यादा ठेवून बोलायला पाहिजे, असे मुंडे म्हणाले.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
नवाब मलिक यांनी वानखेडे यांना जेलमध्ये टाकण्याचं वक्तव्य केलं होतं, ते कुठेतरी खरं होताना दिसतंय का? पत्रकाराच्या या प्रश्नावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "वानखेडे माझा जावई नाही. भाजपचा तर नक्कीच नाही. मलिक आणि वानखेडे यांच्यात काय चाललंय ते चालू द्यावं. पण सर्वसामान्य माणूस मात्र वानखेडेंच्या मागे उभा आहे. याची फार टेस्ट नबाव मलिक यांनी घेऊ नये. हा समाज नेहमीच ज्याच्यावर अन्याय होतो आणि जेव्हा अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यावर अन्याय होतो तेव्हा त्याच्या पाठीशी उभा राहतो, हे मलिक यांनी ध्यानात ठेवावं. मलिक यांच्यासारख्यांना मी माझ्या खिशात ठेवतो." (Drugs Case: क्रुजवरील दाढीवाला काशिफ खान असल्याचा खुलासा, नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केले 'हे' गंभीर आरोप)
क्रुझ ड्र्ग्स पार्टी प्रकरणात नवाब मलिक यांनी सुरुवातीपासूनच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि भाजप नेते यांना आपल्या टीकेचे लक्ष्य केले आहे. तसंच हिवाळी अधिवेशनात मोठंमोठी नावं जाहीर करणार असल्याचंही ते म्हणाले.