शिवसेना हा हिंदुत्वाला सोबत घेऊन चालणार पक्ष, सत्ता स्थापनेसाठी मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन अत्यंत विरोधी पक्षांशी युती करायला तयार होतो. या तिन्ही पक्षांचं महाराष्टराष्ट्रात सरकार यायला आता फक्त अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. या सर्वामागे असलेलं आघाडीचं नाव म्हणजे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत. त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी असलेला शिवसेनेचा अट्टाहास उघडपणे सर्वात आधी बोलून दाखवला. त्यानंतर भाजपला तोंड देत त्यांनी शरद पवार यांच्या भेटी देखील घेतल्या. या सर्व बाबी लक्षात घेता, राष्ट्रवाद काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज संजय राऊत यांचं सोशल मीडियावर कौतुक केलं आहे.
विशेष म्हणजे नवाब मलिक यांनी संजय राऊत यांचं साधंसुधं कौतुक केलं नसून एका शायरीच्या रूपात त्यांची वाहवाह केली आहे. “उसे घमंड है, तलवार उसके हाथ में है, मुझे सुकून है बाजु अभी सलामत हैं! @rautsanjay61” असे ट्विट करीत नवाब मलिक यांनी संजय राऊत यांचं कौतुक तर केलंच पण त्याचसोबत भाजपवर ही त्यांनी निशाणा साधला आहे.
उसे घमंड है तलवार उसके हाथ में है
मुझे सुकून है बाजु अभी सलामत हैं @rautsanjay61
— Nawab Malik (@nawabmalikncp) November 22, 2019
दरम्यान, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतसुद्धा संजय राऊत यांचंच नाव चर्चेत आहे. त्याचसोबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात काल झालेल्या बैठकीतही संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री बनवा असं शरद पवार यांनी उद्धवना सुचवलं असल्याचं बोललं जात आहे.
तर दुसरीकडे नितीन गडकरी यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी ही नवी आघाडी 6 ते 8 महिन्यांहून अधिक टिकणार नाही.