Sanjay Raut | Photo Credits: Twitter

निवडणुकीचा निकाल लागताच मुख्यमंत्री पदासाठी गाजत असणारं नाव म्हणजे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray). पण जेव्हा शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मदत घेत सरकार स्थापन करायचं ठरवलं तेव्हापासून मात्र शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांचंच नाव पुढे येत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री (Shivsena CM Candidate) पदाच्या शर्यतीसाठी शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचं नाव देखील चर्चेत आहेत.

आदित्य आणि उद्धव यांच्या नावांसोबत, पक्षासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देणारे अरविंद सावंत, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांची देखील नावे मुख्यमंत्रीपदासाठी घेतली जात आहेत. परंतु त्याहूनही जास्त पसंती आहे ती संजय राऊत यांच्या नावाला. तसेच टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील संजय राऊत यांच्याच नावाला पसंती दर्शवली आहे.

संजय राऊत हे भाजपला विरोध करत मुख्यमंत्री पदाची मागणी करताना शिवसेनेची खिंड अखेरपर्यंत लढवत आहेत. त्याचसोबत शिवसैनिकच मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसेल असं अनेकदा ठामपणे बोलणारे तेच आहेत. तसेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात ‘सिल्व्हर ओक’मध्ये सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदाबाबत जी चर्चा झाली, त्यात देखील  संजय राऊत यांचंच नाव आघाडीवर असल्याचं टीव्ही 9 ने म्हटलं आहे.

'मुख्यमंत्रीपदच काय इंद्रपद दिले तरीही माघार नाही'- संजय राऊत

दरम्यान आज पुन्हा एकटा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक बैठक होणार असून मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीच्या तारखेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच राज्यपाल 22 आणि 23 नोव्हेंबरला दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याने 24 नोव्हेंबर रोजी 'महाशिवआघाडी' सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे देखील म्हटले जात आहे.