Sameer Khan Arrest Case: समीर खान अटक प्रकरणावरुन नवाब मलिक यांचा पुन्हा एकदा एनसीबीवर हल्लाबोल, पत्रकार परिषदेत केले गंभीरआरोप
Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पाठिमागील काही दिवसांपासून एनसीबी (NCB) या केंद्रीय संस्थेवर जोरदार हल्ला चढवला आहे. एनसीबी राज्यात करत असलेल्या कारवायांवरुन सातत्याने पत्रकार परिषद घेत नवाब मलिक प्रश्न उपस्थित करत आहेत. नवाब मलिक यांनी आज (गुरुवार, 14 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा एनसीबीवर हल्ला चढवला. आजच्या पत्रकार परिषदेत मलिक यांनी जावई समीर खान यांना एनसीबीने केलेल्या अटक प्रकरणावरुन (Sameer Khan Arrest Case) गंभीर आरोप केले. एनसीबीची कारवाई म्हणजे 'फर्जीवाडा' असल्याचे पुन्हा एकदा म्हटले. तसेच, जावई समीर खान (Sameer Khan) यांच्या घरी 200 किलो गांजा सापडल्याच्या बातम्या पेरण्यात आल्या. तो ड्रग्जचं रॅकेट चालवतो असं सांगण्यात आलं. मात्र या सर्व प्रेस रिलीज समीर वानखेडे यांच्या फोन नंबरवरुन पाठविण्यात आल्या होत्या. समीर खान यांच्याबाबत आलेल्या न्यायालयाच्या ऑर्डरमध्ये मात्र त्यांच्याकडे 200 किलो गांजा सापडला नसल्याचे पुढे आले, असे मलिक यांनी या वेळी सांगितले.

एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या समुद्रात क्रुझवर अशीच कारवाई केली. त्यातही अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह 8 जणांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली, असे नवाब मलीक यांनी सांगितले. 13 जानेवारी 2021 या दिवशी समीर खान यांना अटक करण्यात आली. समीर खान हे नवाब मलिक यांचे जावई आहेत. यावर बोलताना नवाब मलिक म्हणाले, माझे जावई समीर खान यांना 200 किलो ड्रग्ज सापडल्याचे सांगत अटक करण्यात आली. तो ड्रग्जचे रॅकेट चालवतो असेही सांगण्यात आले. मात्र, त्यांच्याबाबत आलेल्या न्यायालयाच्या ऑर्डरमध्ये 200 किलो गांजा सापडलाच नसल्याचे उघड झाले असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. (हेही वाचा, Dilip Walse Patil on Sameer Wankhede: समीर वानखेडे यांच्यावर पाळत ठेवण्याच्या सूचना कोणालाही नाहीत- दिलीप वळसे पाटील)

नवाब मलिक पत्रकार परिषद

नवाब मलिक यांनी कोर्ट ऑर्डरचा हवाला देत म्हटले की, समीर खान यांच्याकडे 200 किलो गांजा सापडलाच नाही. शाहिस्ता फर्निचरवाला याच्याकडे केवळ 7.5 ग्रॅम इतका गांजा सापडला. बाकी सर्व हर्बल टोबॅको असल्याचे कोर्टाच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. आश्चर्य आहे की, एनसीबीला गांजा आणि टोबॅको यातील फरक कळत नाही, असा टोलाही मलिक यांनी लगावला.या एजन्सीकडे इन्स्टंट टेस्टिंग किट असते. ज्यातून संबंधित ठिकाणी सापडलेला पदार्थ अंमली पदार्थ आहे किंवा नाही हे समजते याचा अर्थ त्यांनी तपासलेल्या सर्व गोष्टींमध्ये गाजा आढळला नव्हता. तरीही लोकांना यात अडकविण्यात आले. शरिस्ता फर्निचरवाला याच्यावर खटाल दाखल होतो पण त्याला त्याच दिवशी जामीन मिळतो. रिया चक्रवर्ती प्रकरणातही सजनानी याला असंच गुंतवले होते, असा दावाही मलिक यांनी या वेळी केला.