
क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर जोरदार आरोप करण्यास सुरुवात केली. अद्याप आरोपांची ही मालिका संपलेली नाही. "समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार," असे जाहीर वक्तव्य नवाब मलिक यांनी केले आहे. ते मावळ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते.
नवाब मलिक म्हणाले की, "समीर वानखेडे किती बोगस माणूस आहे याचे आमच्याकडे पुरावे आहेत. याचा बाप बोगस होता. हा बोगस आहे. याच्या घरातले बोगस आहेत. याच्या बोगसगिरीचे पुरावे सादर केल्यानंतर हा एक दिवसही नोकरीत राहू शकत नाही, याचा तुरुंगवास निश्चित आहे." (Sameer Khan Arrest Case: समीर खान अटक प्रकरणावरुन नवाब मलिक यांनी NCB वर केलेल्या गंभीर आरोपांवर समीर वानखेडे यांचे उत्तर)
"माझ्या जावयाला तुरुंगात टाकलं आणि वर फोन करुन मला सांगतो, मी काही केलेलं नाही. माझ्यावर वरुन दबाव होता. मग तुझ्यावर दबाव टाकणाऱ्या बापाचं नाव सांग. कोणत्या बापाच्या सांगण्यावरुन हे करतोय? तुझा बाप कोण याचं उत्तर दे. तुझ्या बापाला मी घाबरत नाही," असा घणाघातही मलिक यांनी यावेळी केला. तसंच तुला तुरुंगात टाकल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, हे सर्व भाजपचं कटकारस्थान असल्याचंही ते म्हणाले.
दरम्यान, कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते, असा आरोप मलिक यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत केला. याचा पुरावा म्हणून त्यांनी मालदीवमधील समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित असलेले फोटोज सादर केले. समीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का? याचं उत्तर अपेक्षित आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.