Shweta Mahale On Nawab Malik: मुंबई, शिवसेना भवन येथील बॉम्बस्फोटावरुन भाजप आमदार श्वेता महाले यांचा गंभीर आरोप
Shweta Mahale On Nawab Malik | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भाजप (BJP) आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांनी राज्याचे अल्पसंख्याकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याबाबत धक्कादायक वक्तव्य केले आहे. नवाब मलिक यांनी मुंबई आणि शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) येथे बॉम्बस्फोट घडवून आणले. याच नवाब मलिक यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वाचवत आहेत, असाही आरोप महाले यांनी केला आहे. श्वेता महाले यांच्या आरोप आणि वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघण्याची वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

भाजपा आमदार श्वेता महाले यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना ज्या दिवशी काँग्रेससोबत गेली तेव्हाच त्यांनी हिदुत्त्वाला लाथ मारली असे त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे हिंदुत्तव केवळ अंगावर चढवण्याइतकंच आहे. काँग्रेस सोबत गेलेल्या शिवसेनेकडून एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना संरक्षण दिले जात आहे. बाळासाहेब हिंदुत्त्वाचा विषय घेऊन मोठ झाले. तेच हिंदुत्व आज पक्षप्रमुख विसरले आहेत, अशी टीका श्वेता महाले यांनी केली आहे. (हेही वाचा, Jayant Patil On Nawab Malik: नवाब मलिक यांच्या अटकेमुळे धनंजय मुंडे, प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मोठी जबाबदारी; शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा महत्त्वपूर्ण निर्णय)

नवाब मलिक यांना इडीने अटक केली आहे. त्यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी संबंध असल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात त्यांना अटक झाली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, नवाब मलिक यांच्याकडे असलेल्या खात्यांची जबाबदारी मंत्रिमंडळातील त्यांच्या इतर सदस्यांवर सोपविण्यात आली आहे. मात्र, त्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष भाजपा जोरदार आक्रमक आहे.