
आज महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून (ED) अटक झाली. त्यानंतर संध्याकाळी वर्षा बंगल्यावर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया व्यक्त केली. छगन भुजबळ म्हणाले की, ‘ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आमचे सहकारी मंत्री नवाब मलिक यांच्या घरी आज सकाळी ईडीचे लोक गेले. त्यानंतर त्यांना घेऊन कार्यलयात गेले, तिथे त्यांची चौकशी करून त्यांना कोर्टात उभे केले. हे प्रकरण 1992 सालचे आहे. गेले तीस वर्षे यामध्ये कुठेही नवाब मलिक यांचे नाव आले नाही, मात्र आता अचानक त्यांचे नाव समोर आले, हे मुद्दाम घडवले आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांपासून नवाब मलिक भाजप, केंद्र किंवा ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांच्याबाबत बोलतात म्हणून त्यांचे तोंड बंद करण्याचा हा प्रयत्न आहे. हे लोकशाहीच्या विरोधी वागणे आहे. लोकशाहीला शोभा देणारा हा प्रकार नाही. याद्वारे सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच केंद्राचा हा सरकार पाडण्याचा प्रयत्न आहे. मात्र केंद्राचा डाव हाणून पाडू. याबाबत आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहोत.'
यावेळी त्यांनी सांगितले की, ‘उद्या 10 वाजता मंत्रायालाच्या शेजारी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ पक्षाचे मंत्री, आमदार निषेध नोंदवणार आहेत. त्यानंतर परवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीनही पक्षाचे लोक एकत्र येतील व शांततेने मोर्चा व आंदोलन करतील.’ नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार का? या प्रश्नावर भुजबळ म्हणाले, ‘मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनी काहीही चुकीचे केले नाही व त्यांच्यावरील आरोपही सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही.’ (हेही वाचा: ED Arrests Nawab Malik: मलिकांच्या अटकेनंतर पुण्यात राष्ट्रवादीकडून निषेध, "महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही")
दरम्यान, 'मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील गुन्हेगारांकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर करण्यात येत आहे. याच प्रकरणात नवाब मलिक यांना अटक झाली आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप या आधीच भाजप नेत्यांनी केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी याबाबत स्पष्टोक्तीही दिली होती.'