Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर (Central Investigation Agency) गंभीर आरोप केले आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh ) यांच्यासोबत जो खेळ खेळला गेला. तोच खेळ माझ्यासोबतही खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्याकडे याबाबतचे पुरावे आहेत, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. या प्रकरणात आपली तक्रार आणि पुरावे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देणार असल्याचेही मलिक यांनी म्हटले आहे. ते मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, आर्यन खान याच्याबाबत झालेल्या चुकीच्या गोष्टींविरोधात आम्ही आवाज उठवायला सुरुवात केली. तेव्हापासून काही लोक माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर पाळत ठेवत आहेत. आमच्या काही हितचिंतकांनी या लोकांचा पाटलाग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते पळू लागले. या संशयितांबाबत अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. या लोकांचे ट्विटर हँडल पाहिले असता हे सर्व लोक भाजपशी संबंधित असल्याचे आढळून येते, असेही मलिक म्हणाले. (हेही वाचा, Nawab Malik Tweet: गेल्या काही दिवसांपासून दोन अज्ञात लोक माझ्या घराची पाहणी करत आहेत, नवाब मलिकांचा दावा, संशयितांचा फोटो केला ट्विट)

दरम्यान, केवळ मिच नव्हे तर माझे आई, वडील, नात, नातू यांच्याबाबतही माहिती काढली जात आहे. ते कोठे शाळेला जातात. काय करतात याबाबत माहिती काढणे सुरु आहे. कोणाला काही माहिती हवी असेल तर मला विचारा मी सर्व सांगण्यास तयार आहे. मात्र, असे पाळत ठेवणे योग्य नसल्याचेही मलिक यांनी म्हटले आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा राज्यातील एका मंत्र्याला खोट्या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून जर कोणाला घाबरवण्याचे काम केले जात असेल तर ते सहन केले जाणार नाही. माझ्याकडे केंद्रिय अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप चॅटचे पुरावे आहेत. याबाबत आपण केंद्रीय मंत्री अमित शाह यांना पत्र लिहिणार असल्याचेही मलिक यांनी म्हटले आहे.