Hanuman Chalisa Row: नवनीत राणा यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चॅलेंज; म्हणाल्या, 'माझ्याविरोधात महाराष्ट्रातल्या कोणत्याही जागेवरून निवडणूक जिंकून दाखवावी'
Navneet Rana, Ravi Rana | (Photo Credits: Facebook)

Hanuman Chalisa Row: अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना रविवारी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना त्यांच्या हातात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) दिसली. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, हनुमान चालीसा वाचण्यासाठी मी 14 दिवस किंवा 14 वर्षे तुरुंगात राहण्यास तयार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात माझ्याविरोधात कोणत्याही जागेवरून निवडणूक जिंकून दाखवावी, असं आव्हान यावेळी नवनीत राणा यांनी मुख्यंमत्र्यांना दिलं.

येत्या महापालिका निवडणुकीत मी पूर्ण ताकदीनिशी जनतेमध्ये जाणार असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले. हनुमानाचे आणि रामाचे नाव घेणाऱ्यांना त्रास देण्याचे काय परिणाम होतात हे येत्या काळात महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरेंना सांगेल. मी न्यायालयाच्या आदेशाचा आदर करेन, पण सरकारकडून माझ्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवणार आहे, असंही यावेळी नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं. (हेही वाचा - भायखळा तुरुंगातून सुटल्यानंतर तीन दिवसांनी नवनीत राणा रुग्णालयात दाखल, देवेंद्र फडणवींसांनी घेतली भेट)

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्यापूर्वी खासदार नवनीत राणा यांनी रविवारी सांगितले की, आम्ही लढण्याचा निर्धार केला आहे. मुख्यमंत्री आमच्यावर दबाव टाकून कारवाई करत आहेत. मुख्यमंत्री कोणाला भेटत नाहीत, राज्याच्या दौऱ्यावर येत नाहीत, जिल्हा मंत्रालयात येत नाहीत. महाराष्ट्राला मुख्यमंत्री आहे की, नाही हे कधीच कळत नाही. येत्या एक ते दोन दिवसांत आम्ही आमच्या समस्या दिल्लीत मांडू.

नवणीत राणा यांची 13 व्या दिवशी तुरुंगातून सुटका -

खासदार नवनीत राणा यांची 13 व्या दिवशी 5 मे रोजी तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगातून सुटल्यानंतर नवनीत राणा वैद्यकीय तपासणीसाठी लीलावती रुग्णालयात पोहोचल्या. येथे तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. राणाचे वकील रिझवान मर्चंट यांनी आपल्या अशिलाला तुरुंगात योग्य वागणूक मिळत नसल्याची तक्रार केली होती. रिजवान मर्चंट यांनी भायखळा कारागृह अधीक्षकांना पत्र लिहून नवनीत राणाला स्पॉन्डिलायसीसचा त्रास असून, त्यांना सीटी स्कॅनची सुविधा दिली जात नाही, असे पत्र दिले होते.

दरम्यान, अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांची 5 मे रोजी जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातून सुटका झाली होती. दोघांनाही मुंबई पोलिसांनी 23 एप्रिल रोजी अटक केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याचे राणा दाम्पत्याने सांगितले होते.