Navneet Kaur on Sharad Pawar: शरद पवार यांच्या यूपीए अध्यक्षपदाबाबत नवनीत कौर यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना युपीएचे अध्यक्षपद (UPA President) दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. राहुल गांधी यांनी जबाबदारी घेण्यास नकार दिल्याने शरद पवार यांचे नाव पुढे असल्याची चर्चा आहे. लवकरच शरद पवार युपीएचे अध्यक्षपद स्वीकारतील,असा दावाही केला जात आहे. यावर अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा (Navneet Kaur Rana) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आमचे पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत, जे होईल ते त्यांच्या इच्छेनुसार होईल, असे त्या म्हणाल्या आहेत.

“आमचे पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत. महाराष्ट्रात कोणतीही गोष्ट इथून तिथे गेली असेल, तर ते फक्त शरद पवारच करु शकतात. एनिथिंग इज पॉसिबल, ते सगळ्यात जेष्ठ नेते आहेत आणि राजकारणाच्या क्षेत्रात कोणीही त्यांचा हात धरु शकत नाही. त्यामुळे जे होईल ते शरद पवारांच्या इच्छेनुसार होईल.” असे नवनीत कौर म्हणाल्या आहेत. यासंदर्भात टीव्ही9 ने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Nitesh Rane on Aaditya Thackeray: 'दिशा' शब्दावरुन नितेश राणे यांचा आदित्य ठाकरे यांना नामोल्लेख टाळत टोला

शरद पवार येत्या काही काळात यूपीएचे अध्यक्ष होतील, अशा बातम्या गुरुवारी दिवसभर माध्यमांमध्ये झळकत होत्या. परंतु, सध्या देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन लक्ष हटवण्यासाठी काहीजणांनी हेतू परस्पर ही बातमी पेरली असल्याचे दिसत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. तसेच या सगळ्या चर्चा आहेत. यूपीएच्या अध्यक्षपदाच्या संदर्भामध्ये कोणतेही तथ्य नाही, असे स्वत: शरद पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, “दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधींविरोधात एक मोहिम सुरु असून शरद पवार यांना युपीए अध्यक्ष करण्याची चर्चा हा त्याचाच एक भाग आहे. याच मोहिमेअंतर्गत 23 स्वाक्षऱ्या असणारी चिठ्टी लिहिण्यात आली होती. यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात सुसंगततेची कमतरता शोधण्यात आली. काँग्रेसला संपवण्याचा एक मोठा कट आहे", असा आशयाचे ट्विट काँग्रेसचे जेष्ठ नेते संजय निरुपम यांनी केले आहे.