धक्कादायक! नवी मुंबईत लॉजमध्ये महिलेची गळा चिरुन हत्या
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

नवी मुंबई (Navi Mumbai)  येथील वाशी (Vashi) मधील  असलेल्या एका लॉजवर महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर आरोपीने हत्येनंतर पळ काढला असून आरोपीचा पोलिसांकडून अधिक तपास सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

जुहूगाव येथील संकल्प लॉजवर अशोक दळवी या व्यक्तीसह महिला लॉजवर आली होती. त्यावेळी काही वेळानंतर अशोक दळवी हा लॉजमधील रुममधून एकटा निघून गेल्याचे तेथील लोकांनी पाहिले. परंतु त्याच्या सोबत आलेली महिला ही कुठे गेली हा संयशास्पद प्रश्न पडल्याने लॉजच्या मालकाने रुम येथे धाव घेतली. त्यावेळी रुमची पाहणी मालकाने केल्यावर त्या महिलेचा गळा कापून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी लॉज मालकाने तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून हत्या करण्यात आलेल्या महिलेची पाहणी केली. त्यानंतर अशोक दळवी या नावाने रुम बुक केलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. तर महिलेच्या हत्येमागील कारण आणि महिलेची ओखळ अद्याप पटली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.