नवी मुंबई: APMC मार्केटमध्ये 15 एप्रिल पासून कांदे, बटाटे, भाजीपाला,धान्य विक्रीला होणार सुरूवात
APMC | Photo Credits: commons.wikimedia.org

कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या दरम्यान नवी मुंबईमधील एपीएमसी मार्केटमध्ये ग्राहकांची उडणारी गर्दी पाहता ते बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता. मात्र काल (13 एप्रिल) दिवशी राज्य सरकार आणि APMC मार्केट अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातून सुवर्णमध्य काढण्यात यश आलं आहे. बाजारात कांदे, बटाटे आणि इतर भाज्यांसाठी होलसेल मार्केट पुन्हा सुरू होणार आहे. बुधवार (15 एप्रिल) पासून ट्रेडर्स आणि ट्रान्सपोर्टर्स यांनी बाजार पुन्हा उघडण्यास तयारी दर्शवली आहे. यामुळे नागरिक आणि उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. Coronavirus: देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्यात आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा.  

नवी मुंबईमधील APMC मार्केट पुन्हा उघडताना अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. दरम्यान त्यासाठी Self-Regulation Plan बनवण्यात आला आहे. सोमवारपासून नवी मुंबईमध्ये दाणा मार्केटदेखील बंद आहे. आता स्थानिक पोलिसांच्या मदतीने ट्रेडर्स आणि कामागारांना तसेच नागरिकांना विशेष पास देण्यात येणार आहेत. नागरिकांच्या एपीएमसी मार्केटमधील प्रवेशावर बंधनं घालण्यात येणार आहेत. भारतामध्ये आता लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जाहीर केला आहे.

काही दिवसांपूर्वी करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तसेच मार्केट यार्डमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याने गर्दी वाढत असल्याने नवी मुंबई वाशी येथील एपीएमसी मार्केट शनिवारपासून बंद करण्यात आले होते. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागातील भाजीपाला तसेच कांदा बटाटा याच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती होती. मात्र आता त्यावर निर्णय घेण्यात आला आहे.