नेरूळ, बेलापूर-सीबीडी, खारघर आणि नवी मुंबईच्या (New Mumbai) काही भागांतील अनेक रहिवाशांनी मंगळवारी दुपारी त्यांच्या भागात गॅस गळतीचा (Gas Leak) तीव्र वास येत असल्याची तक्रार अग्निशमन दलाकडे केली आहे. एमजीएल (MGL) गॅस पाईपलाईन कर्मचाऱ्यांनी सांगितले की ते याबाबतची तपासणी करत आहेत, मात्र त्यांना अद्याप हा वास नक्की कुठून येत आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. एनएमएमसीचे (NMMC) आयुक्त अभिजित बांगर म्हणाले की, एमआयडीसी परिसरातून हा वास येत नाही ना हे पाहण्यासाठी ते तिथल्या उद्योगांचीही तपासणी करत आहेत.
एमजीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘एमजीएलला नवी मुंबईच्या विविध भागातून गॅस लीक झाल्याचा वास येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गॅस डिटेक्शन उपकरणासह सज्ज असलेल्या आमच्या आपत्कालीन पथकांनी अशा काही भागांना भेट दिली, जिथून तक्रारी आल्या होत्या. गॅस शोधण्याच्या उपकरणांनी कोणतेही नैसर्गिक वायू गळतीचे संकेत दिले नाहीत. तसेच आम्हाला आमच्या पाइपलाइन सिस्टीममध्येही काही आढळले नाही.’
Mahanagar Gas responds to complaints of gas odour in Navi Mumbai. pic.twitter.com/SFhF9KQWdE
— StockGenesis (@StockGenesis11) September 28, 2021
अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की आत्तापर्यंत गॅस गळतीशी संबंधित आगीची कोणतीही घटना घडलेली नाही, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र नेरुळ आणि तळोजा येथे एमआयडीसी रासायनिक औद्योगिक युनिट्स आहेत, त्यामुळे या गॅस गळतीच्या स्रोताची योग्य चौकशी व्हायला हवी, असे नागरिकांचे म्हणणे आहे. (हेही वाचा: Shiv Bhojan Thali: 1 ऑक्टोबर पासून मोफत शिवभोजन थाळींचे वितरण बंद; जाणून घ्या काय असेल प्रती प्लेट दर)
एनएमएमसीने चेंबूर प्लांटमधून वासाचा स्रोत असल्याचा दावा केला. दरम्यान, एनएमएमसीच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘बीएमसीने आम्हाला सांगितले आहे की चेंबूरमधील एक प्लांट जो नियमितपणे वायू उत्सर्जित करतो तोच या वासाचा स्रोत आहे. सहसा, हा वायू हवेत विरघळतो आणि कोणालाही वास जाणवत नाही. परंतु मंगळवारी आर्द्रता आणि ढगाळ वातावरणामुळे वायू वातावरणात विरघळला नाही.’ याबाबत महानगर गॅसने, नागरिकांना काही समस्या असल्यास, 022-24012400 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.