देशातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संसर्गित रुग्णांचा सर्वात अधिक आकडा हा महाराष्ट्रात आहे,त्यासोबतच तब्बल 300 हुन अधिक संशयित रुग्णांच्या तपासण्या सुरु आहेत, दिवसरात्र वैद्यकीय कर्मचारी या रुग्णांच्या सेवेत रुजू आहेत, मात्र अशा परिस्थितीत रुग्णांकडूनच काहीशी बंडखोरी केले जात असल्याचे समोर येतेय.रविवारी, नवी मुंबई (Navi Mumbai) येथील पनवेल (Panvel) मध्ये स्थित उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रॉमा केअर युनिट येथून कोरोनच्या तब्बल 11 संशयित रुग्णांनी हॉस्पिटल मधून पळ काढल्याचे समजत आहे. या सर्व रुग्णांची कोरोना चाचणी झाली होती मात्र त्यांचे रिपोर्ट्स अद्याप येणे शिल्लक होते, तत्पूर्वीच या रुग्णांनी पळ काढल्याने आता यापैकी एकालाही जर का व्हायरसची लागण झाली असेल तर या व्यक्तीच्या माध्यमातून अन्य अनेकांपर्यंत हा व्हायरस पसरण्याची शक्यता आहे. यासोबतच रुग्णालयाचे काही कर्मचारी सुद्धा बेपत्ता आहेत.
प्राप्त माहितीनुसार, या सर्व रुग्णांनी मागील काही दिवसात दुबईतून प्रवास केला होता, त्यांनंतर त्यांची तपासणी करण्यासाठी त्यांना पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रॉमा केअर युनिट मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र चाचणी होताच रिपोर्ट येण्याची सुद्धा वाट न पाहता या रुग्णांनी पलायन केले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी असाच प्रकार नागपूर येथे देखील घडला होता. नागपूर मधील, मायो हॉस्पिटलमधून 5 कोरोना संशयित रुग्ण बेपत्ता झाले होते, त्यापैकी एकाला कोरोनाची लागण न झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आले होते. सद्य घडीला महाराष्ट्रात तब्बल 33 ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये पुण्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. या सर्व रुग्णांवर दिवसरात्र उपचार केले जात आहेत.