Nagpur Hospital | (Photo Credits: ANI)

जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसने (coronavirus) आता महाराष्ट्रातही आपले जाळे पसरवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात आता कोरोनाग्रस्तांची संख्या 19 वर पोहचली आहे. पुण्यात 10, नागपुरात 3, मुंबईत 4, ठाण्यात 1 तर नगरमध्ये 1 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. अशा गंभीर परिस्थितीत नागपूरातील (Nagpur) मायो हॉस्पिटलमधून (Mayo Hospital) 5 कोरोना संशयित रुग्ण बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यापैकी एकाला कोरोनाची लागण न झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आले असून चार जणांचे रिपोर्ट्स अद्याप हाती आलेले नाहीत. रुग्ण बेपत्ता झाल्याने हॉस्पिटल प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. (कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज, जिम, जलतरण केंद्र बंद; मॉल्स आणि थिएटर मात्र खुली राहणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती)

दरम्यान, या संशयित रुग्णांना लवकरच शोधून पुन्हा हॉस्पिटलमध्ये आणण्यात येईल, अशी माहिती नागपूर पोलिस उप निरीक्षक एस. सुर्यवंशी यांनी दिली आहे.

ANI Tweet:

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा कार्यरत असून आजपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड येथील सर्व जिम आणि स्विमिंग पूल्स 30 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. तसंच नागपूरातील सर्व सिनेमागृह, जिम, स्विमिंग पूल आणि पब्लिक गार्डन 30 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

देशात आतापर्यंत कोरोना व्हायरसचे 83 रुग्ण आढळून आले आहेत. तर या विषाणूंची लागण झाल्याने 2 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.