Narayan Rane | (Photo Credits-ANI Twitter)

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना केली जाणारी अटक ही कायदेशीर प्रक्रियेनुसारच आहे. अटक करण्यापेक्षा अशा घटना पुन्हा पुन्हा घडू नयेत ही यातील महत्त्वाची बाब आहे, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Nashik Police Commissioner Deepak Pandey) यांनी दिली आहे. नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचे स्वरुप पाहता त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठीच नारायण राणे यांना अटक करण्यासाठी पथक पाठविण्यात आल्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) यांनी म्हटले आहे. नारायण राणे यांना अटक करताना सर्व प्रकारे प्रोटोकॉलचे पालन केले जाईल. कोणत्याही प्रकारे हक्कभंग होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल, अशी माहिती पांडेय यांनी दिली आहे.

नारायण राणे यांना अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्याबाबतचे आदेश आहेत. तर दुसऱ्या बाजूला अटक टाळण्यासाठी नारायण राणे यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. प्राप्त माहितीनुसार, नारायण राणे यांच्यावर आतापर्यंत तीन ठिकणी गुन्हे दाखल झाले आहेत. पहिला गुन्हा नाशिक येथे दाखल झाला आहे. तर पुणे आणि महाड येथेही राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. राणे यांच्यावर तिन्ही ठिकाणी गुन्हे दाखल झाल्यानंतर तिन्ही ठिकाणाहून पथके राणेना अटक करण्यासाठी रवाना झाली आहेत. त्यामुळे राणे यांना अटक होणार का? नेमके कोणते पथक अटक करणार याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Narayan Rane: नारायण राणे यांची गुन्हा दाखल झाल्यानंत पहिली प्रतिक्रिया)

दरम्यान, नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर जोरदार पडसाद उमटले आहेत. मुंबई येथील जुहू परिसरात शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन सुरु केले आहे. हे शिवसैनिक युवा सेनेचे असल्याचे समजते. जुहू परिसरात नारायण राणे यांचे निवासस्थान आहे.

नारायण राणे नेमकं काय म्हटले होते?

रायगड येथील महाड येथे नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा पोहोचली. या यात्रेदरम्यानस सोमवारी (8 ऑगस्ट) बोलताना नारायण राणे यांची जीभ घसरली. नारायण राणे म्हणाले की, ''त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हीरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती''.