Nashik-Mumbai Highway Empire Of Potholes: 'खड्ड्यामुळे चुकला विमान प्रवास' हे शिर्षक वाचून अनेकांना खरोखरच धक्का बसू शकतो. खड्ड्यांचा आणि विमानाचा संबंध तरी काय? असाही सवाल काही लोक विचारु शकतात. नाशिक-मुंबई महामार्गावर खरोखरच असे घडले आहे. युवा उद्योजक निखिल पांचाळ (Nikhil Panchal) यांना हा अनुभव आला आहे. 'मेक इन इंडिया' संदर्भातील एका कार्यक्रमासाठी त्यांना जर्मनीमध्ये एका अभियांत्रिकी प्रदर्शनात भेटायचे होते. या प्रदर्शानात सहभागी होण्यासाठी ते पाठिमागील वर्षभरापासून तयारी करत होते. निश्चित कार्यक्रमानुसार आखणी करुन त्यांनी विमानाचे तिकीटही बुक केले. जर्मनीहून मुंबईसाठी त्यांनी विमान घेतले. निश्चित तारखेला ते नाशिक-मुंबई महामार्गावरुन मुंबईच्या दिशेने निघाले. पण दुपारी दोन वाजता निघालेले पांचाळ हे रात्रीचे आठ वाजले तरीही मुंबईत पोहोचू शकले नाहीत. रस्त्यावर इतके खड्डे होते की, त्यांना प्रवास करणे मुश्कील होऊन बसले. परिणामी त्यांचे विमान चुकले. त्यांना प्रदर्शनात सहभाहीही होता आले नाही.
महामार्ग खड्डेमुक्त करा मगच टोल मागा
निखिल पांचाळ हे केवळ एक प्रातिनिधीक उदाहरण. पण, शेकडो नागरिकांना रोज हा अनुभव येतो. महामार्ग असूनही रस्त्यांवर इतके खड्डे असतात की वाहनाला वेगच धारण करता येत नाही. वेग वाढला तर अपघात निश्चित. त्यामुळे वाहनचालक अत्यंत हळुवारपणे वाहने हाकतात. परिणामी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. नाशिक मुंबई महामार्गाच्या या स्थितीवरुन आता नागरिक आणि नियमीत प्रवासी आक्रमक झाले आहेत. 'एबीपी माझा' या खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, रस्ता आणि सेवा चांगली नाही तर टोलही नाही असे म्हणत सामाजिक संस्था, संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यामध्ये अनेक नागरिस, उद्योजक, व्यापारी, प्रवासी यांचा समावेश आहे. विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जवळपास 26 पेक्षाही संघटनांनी टोल न भरण्याची भूमिका घेतली आहे. जोपर्यंत महामार्ग खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत टोल न भरण्याच्या भूमिकेवर हे आंदोलक ठाम आहेत.
पावसाळी अधिवेशन गाजले रस्त्यांवरील खड्ड्यांनी
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही रस्त्यांवरील खड्डे हा मुद्दा प्रचंड गाजला होता. अधिवेशन काळात विधिमंडळ सदस्यांनाही प्रवास करताना रस्त्यांचा अडथळा येत होता. त्यामुळे हे सदस्य (आमदार) शक्यतो रेल्वे प्रवास करत असत. ज्यामुळे खड्ड्यांतून रस्ता शोधत मार्ग काढावा लागणे टळत असे.