नाशिक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Graduates Constituency Election Result 2023) अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे ( Satyajit Tambe) यांच्या समर्थकांना त्यांच्या विजयाची इतकी खात्री आहे की, ते चक्क गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. सत्यजित तांबे यांना मानणाऱ्या पुण्यातील एका गटाने चक्क मतमोजणी सुरु होण्याआगोदर सकाळपासूनच तांबे यांच्या विजयाचे बॅनर झळकावले आहेत. त्यामुळे तांबे यांच्या समर्थकांना विजयाची इतकी खात्री आणि घाईसुद्धा का आहे? असाही सवाल उपस्थित केला जातो आहे. तांबे यांच्या विजयाचे बॅनर माजी आमदार विनायक निम्हण (Vinayak Nimhan) यांचे सुपुत्र सनी निम्हण (Sunny Nimhan) यांनी लावले आहेत. उल्लेखनिय असे की, विनायक निम्हण हे एकेकाळी शिवसेना आमदार राहिले आहेत. त्यांच्या पुत्राने पुण्यातील बाणेर परिसरात बॅनर झळकावले आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष सत्यजित तांबे विरोधात महाविकासआघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील (Shubhangi Patil) असा सामना रंगला आहे. तांबे विरुद्ध पाटील असा निकराचा संघर्ष असतानाच दोन्ही बाजूंना विजयाची पूर्ण खात्री आहे. त्यामुळे जोरदार दावे प्रतिदावे केले जात आहेत. दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नुकतीच मतमोजणी सुरु झाली आहे. त्यामुंळे अंतिम निकाल नेमका काय येणार याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, कोकण शिक्षक मतदार संघ निवडणुकीत भाजपा चे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा दणदणीत विजय)
नाशिक पदवीधर मतदारसंघ सुरुवातीपासूनच जोरदार चर्चेला आला. सत्यजित तांबे हे तसे काँग्रेसचे नेते आणि कट्टर कार्यकर्ते. त्यांच्याकडे युवा काँग्रेसचीही मोठी जबाबदारी होती. पण, काँग्रेस पक्षाने त्यांच्या वडिलांना उमेदवारी दिली. त्यामुळे सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यांच्या वडीलांनी पक्षाने एबी फॉर्म आणि उमेदवारी देऊनही निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामुळे सहाजिकच काँग्रेस तोंडघशी पडला. पुढे सत्यजित तांबे यांना पक्षातून निलंबीत करण्यात आले.
दुसऱ्या बाजूला शुभांगी पाटील या तशा भाजप कार्यकर्त्या. बराच काळ त्यांनी भाजपमध्ये काम केले. पण, बाजपने ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारली. परिणामी शुभांगी पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यातच काँग्रेसमध्ये झालेला घोळ त्यांच्या पथ्यावर पडला आणि महाविकासआघाडीने शुभांगी पाटील यांना पुरस्कृत केले. त्यामुळे दोन्ही बाजूंनी काट्याची टक्कर सुरु आहे. दोन्ही बाजूंनी क्षणाक्षणाला उत्कंटाही वाढत आहे.