Photo Credit- X

नाशिक शहरापासून 8 किमी अंतरावर असलेल्या विहितगाव येथील एका शेतकऱ्याने आपल्या चार वर्षांच्या मुलाला वाचवण्यासाठी बिबट्याचा (Leopard Attack in Nashik) सामना केला. ही घटन गुरुवारी (26 डिसेंबर) रात्री येथील हांडोरे मळ्यात घडली. आपल्या डोळ्यासमोर मुलाला उचलून घेऊन निघालेला बिबट्या (Leopard Attack) पाहून चिमुकल्याचे वडील प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी थेट बिबट्यावर धाव घेतली आणि त्याच्याशी झुंज (Wildlife-human Conflict) दिली. परिणामी जबड्यात उचलेला मुलगा जागीच सोडून बिबट्याला शिवाराच्या दिशेने रिकामीच धाव घ्यावी लागली. वडिलांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

मागचे पाय पकडल्याने बिबट्या जायबंदी

वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विहितगाव परिसरातील हंडोरे मळा येथे हा मुलगा घराबाहेर खेळत होता. इतक्यात शिवारातून आलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला जबड्यात धरुन खेचायला सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरुन गेलेल्या मुलाने जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. ते पाहून वडिल तेथे धावून आले आणि त्यांनी बिबट्याचे मागचे पाय पकडून ठेवले. ज्यामुळे बिबट्याला पुढे जाता येणे कठीण झाले. अवघ्या काहीच क्षणांचा हा खेळ. पण अचानक आलेल्या अडथळ्याने बिबट्या गांगरुन गेला. अनपेक्षीतपणे घडलेल्या या कृतीमुळे बिबट्याला मागचे पायच उलता येत नाव्हते. त्यामुळे त्याने जबड्यातील मुलगा खाली सोडला. मुलाचा बचाव झाल्याचे पाहताच त्याच्या वडिलांनी बिबट्याचे मागचे पाय सोडून दिले. ज्यामुळे बिबट्याने शिवारात धाव घेतली. (हेही वाचा, Leopard Attack in Gujarat: जामनगर बिबट्याची दहशत, आई शेजारी झोपलेल्या 5 महिन्याच्या बाळावर केला हल्ला)

मुलाच्या शरीरास दुखापत परंतू, प्रकृती स्थिर

नाशिक वन विभागाने अधिक माहिती देताना सांगितले की, मुलाचे प्राण वाचले असले तरी, बिबट्याच्या हल्ल्यात त्याच्या शरीरास गंभीर जखमा झाल्या आहे. मान, पाठ आदी भागावर झालेल्या जखमा अद्यापही ओल्या आहेत. शिवाय, उजव्या हातावरही किरकोळ जखमा आहेत. त्यामुळे त्याला अधिक उपचारांची गरज आहे. मुलाला सुरुवातीला नाशिक जिल्हा नागरी रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मुलाची प्रकृती स्थिर आहे आणि त्याला लवकरच डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा, Leopard Attack in Shirur: शिरूरमध्ये बिबट्याचा धुमाकळ; दोन हल्ल्याच्या घटनांत एक ठार, दुसरा जखमी)

ग्रामस्थांमध्ये घबराट, वनविभागाची कारवाई

या घटनेमुळे विहितगावच्या ग्रामस्थांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तातडीने पावले उचलण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. प्रत्युत्तरादाखल वन अधिकाऱ्यांनी गावाजवळ पिंजरा लावला आणि 7-8 कर्मचाऱ्यांच्या चमूसह शोधमोहीम सुरू केली. असे असले तरी बिबट्या अद्यापही गायब आहे. गेल्या आठवड्यात विहितगाव-वडनेर रस्त्यावर बिबट्या दिसला होता, त्यामुळे परिसरात आणखी एक पिंजरा बसवण्यात आला होता, असे समजते. दरम्यान, एकट्या नाशिक जिल्ह्यात यावर्षी बिबट्याच्या हल्ल्यात किमान तीन जणांचा मृत्यू झाला आहे आणि 14 जण जखमी झाले आहेत