Nashik: 550 ग्रॅम वजनाच्या नवजात बालिकेला सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिले जीवनदान
New Born | Representational image | (Photo Credits: YouTube)

नाशिक (Nashik) मधील डॉक्टर आणि नर्सेसनी एका नवजात मुलीला जीवनदान दिले आहे. नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील Sick Newborn Care Unit (SNCU) च्या डॉक्टरांनी तब्बल तीन महिने काळजी घेऊन एका कमी वजनाच्या बालिकेला वाचवले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, जन्माच्या वेळी या बालिकेचे वजन 550 ग्रॅम इतके होते. 3 महिन्यानंतर रुटिन चेकअप दरम्यान या बालिकेचे वजन 1600 ग्रॅम आढळून आले.

या मुलीचा जन्म प्रेग्नेंसीच्या 27 व्या आठवड्यातच झाला. एका खाजगी रुग्णालयात सी-सेक्शनद्वारे या  मुलीचा जन्म जून महिन्यात झाला. त्यानंतर पुढील उपचारांसाठी तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. (धक्कादायक! हॉस्पिटल चे बील भरायला पैसे नाहीत म्हणुन पोटच्या नवजात बाळाला 1 लाखात विकलं, वाचा सविस्तर)

इतक्या कमी वजनाच्या बाळावर उपचार करण्याचा हा आमचा पहिलाच अनुभव आहे. यापूर्वी आम्ही 800 ग्रॅम वजनाच्या बाळावर उपचार केले होते. परंतु, 550 ग्रॅम वजन असलेल्या बाळावर प्रथमच उपचार केले. सर्व डॉक्टर्स आणि नर्सेसनी 3 महिने केलेल्या परिश्रमाचे हे फळ आहे, असे सिव्हिल हॉस्पिटल बालरोगतज्ज्ञ पंकज गाजरे यांनी सांगितले.

सामान्यपणे कमी वजन असलेल्या नवजात बालकांवर यशस्वीरित्या उपचार करणे खूप कठीण असते. या मुलांच्या सर्व अवयवांची पूर्ण वाढ झालेली नसल्यामुळे त्यांच्या मेंदू आणि फुफ्फुसामधून ब्लिडिंग होण्याची शक्यता असते. या बालिकेला surfactant देण्यात आले आणि 3 आठवड्यांपर्यंत पॉझिटीव्ह एअर व्हे प्रेशर देण्यात आले, असे गाजरे म्हणाले.

या बालिकेच्या आईचे वय 28 वर्ष असून ती एका खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. तर वडील वॉर्डबॉय म्हणून काम करतात. सातव्या महिन्यात बालिकेच्या आईचे ब्लड प्रेशर सातत्याने वाढत असल्यामुळे इर्मजन्सीमध्ये डिलिव्हरी करावी लागली. डॉक्टरांनी केलेल्या या कार्यासाठी बाळाच्या आईने त्यांचे आभार मानले आहेत. पुढे त्यांनी सांगितले की, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बाळावर उपचार करु नका, असे मला अनेकांनी सांगितले. मात्र मी सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टारांवर विश्वास ठेवला आणि त्याचे फळ मला मिळाले.