नाशिक (Nashik) मधील शेंद्री पाडा (Shendripada) येथे लाकडी ओडक्यांवरून महिलांना पाण्याचे हंडे घेऊन जावे लागत होते. जीव मूठीत घेऊन महिला करत असलेला हा संघर्ष पाहून तत्कालीन पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी लोखंडी पूल बांधून दिला होता. मात्र मागील काही दिवसांत नाशकात झालेल्या तुफान पावसात तो देखील वाहून गेल्याने पुन्हा या महिलांच्या नशिबात लाकडी ओडक्यांवरून चालत जाण्याची वेळ आली आहे.
एबीपी माझा च्या वृत्तानुसार, मागील 10 दिवस नाशिक जिल्ह्यासोबतच इगतपुरीमध्ये तुफान पाऊस झाला. अनेक ठिकाणी पूर आला होता. नद्या दुथडी भरून वाहत होत्या. पाण्याच्या प्रवाहामध्ये हा लोखंडी पूल वाहून गेला आहे.
जानेवारी 2022 मध्ये आदित्य ठाकरेंच्या हस्ते झालेलं पुलाचं उद्घाटन
View this post on Instagram
आदित्य ठाकरे यांनी जानेवारी 2022 मध्ये प्रत्यक्ष शेंद्री पाड्याला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. महिलांच्या सोयीसाठी पूल बांधून दिला होता. अवघ्या 3-4 दिवसात हा पूल उभा राहिला होता पण आता पहिल्याच मोठ्या पावसात तो वाहून गेल्याने आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार हा पूल 30 फूटापेक्षा अधिक उंचीवर बांधण्यात आला होता. इतक्या कमी उंची वरील पूल पावसाळ्यात पाण्याखाली जाईल असा अंदाज व्यक्त करत अजून थोडा वर बांधावा असे स्थानिकांनी सूचवले होते पण अधिकार्यांनी दुर्लक्ष केले असे सांगण्यात आले आहे. दरम्यान आता पूल वाहून गेल्याने महिलांना पुन्हा जीव मूठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे.
नाशिक मध्ये मागील आठवड्यात पूराच्या पाण्याने शहराला वेढा घातला होता. अनेक मंदिरं पाण्याखाली गेली होती. गोदावरी दुथडी भरून वाहत होती तसेच गंगापूर डॅमचे देखील दरवाजे उघडले असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.