नरेंद्र पाटील यांनी शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी (Narendra Patil quits Shiv Sena) दिली आहे. नरेंद्र पाटील (Narendra Patil) हे मजी आमदार आहेत. सध्या ते माथाडी कामगारांचे नेतृत्व करतात. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये ते सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शिवसेना (Shiv Sena) उमेदवार होते. नरेंद्र पाटील हे शिवसेनेत असले तरी प्रदीर्घ काळापासून त्यांचे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे संबंध अधिक निकटचे राहिले होते.नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' तर केला. मात्र, आता ते राजकीय भूमिका काय घेणार याबाबत उत्सुकता आहे.
नरेंद्र पाटील यांनी शिवसेना सोडताना काही आरोप केले. राज्यात महाविकासआघाडी सरकार येऊन दीड वर्ष झाले. तरीही अद्याप कामगारांचे प्रश्न कायम आहेत. कामगारांच्या प्रश्नासाठी अनेकदा वेळ माघूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बैठकीसाठी वेळ देत नाहीत. त्यामुळे आपण शिवसेना सोडत असल्याचे नरेंद्र पाटील यांनी म्हटले. (हेही वाचा, PC Chacko To Join NCP: पीसी चाको यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश)
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आपले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हे संबंध शिवसेनेतील काही नेत्यांच्या डोळ्यात खुपत आहेत. मी शिवसेनेत राहू नये अशीच या नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळे माझा नाईलाज आहे. या नाईलाजातूनच आपण शिवसेना सोडत असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि नरेंद्र पाटील यांनी एकमेकांची गळाभेट नुकतीच घेतली. या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले.त्यानंतर अल्पावधीतच नरेंद्र पाटील यांनी शिवसेना सोडली. आता ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.