शिवसेनेने आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभांचे सत्र सुरु केले आहे. कणकवलीमधील शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारासाठी आज उद्धव ठाकरे यांची सभा तिथे पार पडली. इथे केलेल्या भाषणात त्यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांना युतीमधील खडा म्हणत शाब्दिक वार केले. त्यावर नारायण राणे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'मी अशा गोष्टी कधी पचवत नाही. पचवणार पण नाही. माहिती घेतो आणि बोलतो’ असे नारायण राणे म्हणाले आहेत. यावरूनच नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष असाच चालू राहणार असे दिसून येत आहे.
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी, 'नारायण राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची वाट लागते. त्यांनी काँग्रेसची विल्हेवाट लावली आणि आता ते भाजपात गेले आहेत. राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल माझ्याकडून भाजपला शुभेच्छा', असा प्रहार केला होता. इतकेच नाही तर ‘राणे’ हे पाठीमागून वार करणारे आहेत त्यामुळे भाजपला मी सांभाळून राहण्याचा सल्ला देतो, असेही म्हणाले आहेत. यावर बोलताना नारायण राणे, मी अशा गोष्टी कधी पचवत नाही. पचवणार पण नाही असे म्हणाले आहेत.
काल नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन झाला. नारायण राणे यांच्या अशा पक्षबदलाचा उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. दरम्यान भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये युती झाली असली तरी, अशा काही जागा आहेत जिथे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर ठाकले आहेत. त्यातीलच एक म्हणजे कणकवली. कणकवलीत भाजपचे नितेश राणे आणि शिवसेनेचे सतीश सावंत हे आमने सामने यामुळेच उद्धव ठाकरे यांची आजची सभा महत्वाची ठरली.