Narayan Rane's Reaction on Arrest: नारायण राणे यांनी मानले सहकाऱ्यांचे आभार
Narayan Rane | (Photo Credits- Twitter)

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी अटक प्रकरणानंतर पहिल्यांदाच अधिक शब्दांध्ये प्रतिक्रिया दिली होती. महाड कोर्टाने काल (मंगळवार, 24 ऑगस्ट) रात्री राणे यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर रात्री उशीरा राणे यांनी 'सत्यमेव जयते' हे दोनच शब्द लिहून ट्विट केले होते. त्यानंतर आज मात्र राणे (Narayan Rane's Reaction) यांनी ट्विट करुन सर्वांचे आभार मानले आहेत. आपल्या ट्विटमध्ये राणे यांनी म्हटले आहे की, ''कालच्या प्रसंगामध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझ्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व माझ्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार''.

काय आहे प्रकरण?

नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अटक करण्यात आली होती. राणे यांच्या अटकेची प्रक्रिया संपूर्ण दिवसभर राबवली गेली. अखेर सायंकाळी राणे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना महाड कोर्टासमोर हजर करण्यात आले. महाड कोर्टाने सरकारी बाजू आणि नारायण राणे यांची बाजू वकीलांच्या मार्फत जाणून घेतली. त्यानंतर कोर्टाने राणे यांना सशर्थ जामीन मंजूर केला. जामीन मंजूर झाल्यावर विशेष कोणतीही प्रतिक्रिया देताना राणे यांनी ट्विटरवर केवळ 'सत्यमेव जयते' असे दोन शब्द ट्विट करत मर्यादित प्रतिक्रिया दिली होती.

नारायण राणे दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेत राणे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा, Narayan Rane यांना जामीन मंजूर झाल्यानंतर Pravin Darekar यांची पहिली प्रतिक्रिया)

ट्विट

दरम्यान, नारायण राणे यांचे पूत्र आमदार नितेश राणे यांनी मात्र ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर करत शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. नारायण राणे यांच्या जामीनानंतर नितेश राणे यांनी 'राजनिती' चित्रपटातील मनोज वाजपेयी यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान आगामी काळात राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष पुन्हा एकदा कोकणात पाहायला मिळू शकतो. या आधीही महाराष्ट्राने हा संघर्ष अनेक वेळा पाहायला मिळाला आहे.