Narayan Rane (Pic Credit - ANI)

Narayan Rane On Kunbi Caste Certificate: मराठा आरक्षण (Marath Reservation) आंदोलन एका बाजूला तापत असताना आणि आंदोलनाचे विद्यमान नेते मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला अल्टीमेटम संपत आलेला असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. आपण 96 कुळी मराठाआहोत. कोणताच मराठा कुणबी (Kunbi Certificate) दाखला घेणार नाही. जातीला किंवा वर्गाला आरक्षण देताना घटनेचा अभ्यास करावा लागतो. जरांगे यांनीही तो करावा. मी तो केला आहे. त्यामुळे घटना काय सांगते मला माहिती आहे, असे विधान राणे यानी केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणारे आंदोलनकर्ते आणि नेते जरांगे यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते याबाबत उत्सुकता आहे.

नारायण राणे यांचे विधान अशा वेळी आले आहे ज्या वेळी मराठा आरक्षणाचा लढा निर्णायक वळणावर आहे. समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर सामाजिक घुसळण सुरु आहे. तुरुणांच्या आशा आकांक्षा प्रचंड विस्तारत असून त्यांचा शैक्षणिक दर्जा वाढला आहे. मात्र, त्या प्रमाणात त्यांचा आर्थीक दर्जा वाढला नाही. त्यांच्या हाताला त्यांच्या बौद्धीक क्षमतेला साजेसे काम उपलब्ध नाही. तरुणांपुढे प्रचंड आव्हान असताना ते आपली संधी आरक्षणामध्ये शोधत आहेत. अशा वेळी राणे यांचे विधान आल्याने त्यावर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या बाजूला नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. शरद पवार हे हमासचे कौतुक करतात. पण त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले चांगले काम दिसत नाही काय? काही लोकांचा बचाव करण्यासाठी पवार हे कधीच समाजाच्या किंवा देशाच्या हिताचे बोलत नाहीत. त्यांना केवळ मोदीविरोधाची कावळी झाल्याने त्यांना चांगली कामेच दिसत नाहीत, असे नारायण राणे म्हणाले. मुंबईमध्ये 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटावेळी शरद पवार यांनी मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झालाच नसतानाही तो झाला असं खोटं का सांगितले? ते विशिष्ट समूदयाच्या लोकांनाच पाठिशी घालण्याचा प्रयत्न त्यांनी का केला असाही सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी इस्त्रायल आणि हमास यांवरुन केलेली टीका चुकीची असून पंतप्रधांनी केवळ दहशतवादी हल्ल्याबाबत भूमिका मांडली होती. त्यांनी मांडलेली भूमिका ही पॅलेस्टीन विरोधातील नव्हती. खरे तर शरद पवार यांनी देशाच्या राजकारणात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. असे असतानाही त्यांनी ते देशासाठी राष्ट्र प्रथम ही भूमिका कधी घेणार आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.