केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या मुंबई मधील 'अधिश' बंगल्यावर (Adhish Bungalow) अखेर हातोडा पडला आहे. कोर्टाने अनधिकृत बांधकाम त्यांच्याकडून पाडले जावे अन्यथा मुंबई महानगरपालिकेला (BMC) तोडक कारवाई करावी लागेल असा आदेश दिल्यानंतर आता राणेंकडून स्वतः अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरूवात झाली आहे. पुढील 7-8 दिवसांत हे अनधिकृत बांधकाम तोडले जाणार आहे.
नारायण राणे यांचा 'अधिश' हा बंगला जुहू येथे समुद्र किनारी आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी नारायण राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले असल्याची तक्रार मुंबई मनपाला केली होती. बीएमसीकडे तक्रार आल्यानंतर कारवाईने वेग घेतला होता. अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते. सोबतच हायकोर्टाने नारायण राणे यांना 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. सीआरझेड कायदा आणि एफएसआयचे उल्लंघन केल्याचे हायकोर्टाने म्हटलं आहे. दोन आठवड्यात कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिले होते. परंतु मुंबई महापालिकेने कारवाई करण्याच्या आधीच राणे यांनी स्वत:हून बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यास सुरुवात केली आहे. हे देखील नक्की वाचा: Bmc New Notice To Narayan Rane: नारायण राणे यांना मुंबई महापालिकेची नोटीस, 'बंगल्यातील अनधिकृत बांधकाम हटवा अन्यथा कारवाई करु'.
मुंबई महानगरपालिका कायदा 1888 अंतर्गत सेक्शन 488 नुसार मुंबई महानगरपालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अनधिकृत बांधकामाविरूद्ध नोटीस पाठवण्यात आली. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या बंगल्याची पाहणी देखील केली होती. त्यानंतर महापालिकेने बांधकाम तोडण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यावरुन राणे यांनी हाकोर्टात धाव घेतली होती.