Narayan Rane Granted Bail: मंत्री नारायण राणे यांना दिलासा; स्पेशल कोर्टाने मंजूर केला जामीन
Narayan Rane | (Photo Credits-ANI Twitter)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल थप्पड मारण्याचे वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना आज अटक करण्यात आली होती. आता माहिती मिळत आहे आहे की नारायण राणे यांना जामीन मंजूर झाला आहे. एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वात जवळचे आणि राज्यातील एक शक्तिशाली नेते समजले जाणारे राणे, आता ठाकरे कुटुंबाचे अर्थात उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठे विरोधक मानले जातात. सोमवारी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना थप्पड मारण्याबाबत भाष्य केले होते. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध राज्यात ठिकठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आल्या, याच पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी त्यांना अटक झाली होती.

महाराष्ट्रात सध्या राजकीय वाद पेटला आहे. पोलिसांनी अटक केलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज दुपारी न्यायालयाकडून दिलासा मिळू शकला नाही. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यांची कोठडी महाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. त्यानंतर  राणे यांना एमआयडीसी महाड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आज रात्री राणे यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले गेले व स्पेशल कोर्टात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावली पार पडली.

नारायण राणे यांच्यावर राजकीय हेतून प्रेरित कलमे लावली गेली, तसेच प्रकृतीचे कारण देत नारायण राणे यांच्या वकिलांनी कोर्टाकडे जामीन मागितला. राणे यांना आजची रात्र कोठडीत व्यतीत करावी लागते का काय? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र आता त्यांना जामीन मिळाला आहे.

काय आहे प्रकरण?

महाडमध्ये जन आशीर्वाद यात्रा पोहोचल्यावर यात्रेदरम्यान सोमवारी, 8 ऑगस्ट रोजी बोलताना नारायण राणे नारायण राणे म्हणाले की, 'त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हीरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती.' दरम्यान, यामुळे भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गोंधळ घातला. (हेही वाचा: Narayan Rane Arrest Case: नारायण राणे यांच्या अटके नंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया)

नारायण राणे यांच्याविरोधात नाशिक, पुणे आणि महाराष्ट्राच्या महाडमध्ये IPC कलम 500, 505 (2) आणि 153-B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एखाद्या केंद्रीय मंत्र्याला महाराष्ट्रात अटक होण्याची ही पहिलीच घटना आहे. याशिवाय जवळपास 20 वर्षांनंतर एका केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याला अटक करण्यात आली आहे. जून 2001 मध्ये तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारमधील मंत्र्यांना, मुरासोली मारन आणि टीआर बाळू यांना चेन्नई पोलिसांनी अटक केली.