Chandrakant Patil | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे गावजेवण जनतेने नाकारले, अशी चर्चा देगलूर बिलोली (Deglur Biloli ) विधानसभा मतदारसंघात रंगली आहे. देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचारादरम्यान 'भाजपला आघाडी द्या तुम्हाला गावजेवण (Gavjevan) देईन' अशी ऑफर चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना आणि उपस्थित जनतेला दिली होती. प्रत्यक्षात मात्र काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांच्याकडून भाजपच्या सुभाष साबणे (Subhash Sabne) यांचा दणदणीत पराभव झाला. या पराभवानंतर चंद्रकांत पाटील यांचे गावजेवण नाकारल्याची चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

' भाजपला आघाडी द्या तुम्हाला गावजेवण देईन. भाजपला इथून आघाडी मिळाल्यावर केवळ गावजेवणच दिले जाणार नाही. तर मी स्वत: या ठिकाणी गावजेणात सहभागी होईल.' (हेही वाचा, Deglur Assembly by Election Result: देगलूर-बिलोली काँग्रेसच्या पंजात, जितेश अंतापूरकर यांचा दणदणीत विजय; भाजपला झटका)

देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीबाबत बोलायचे तर भाजपचे सुभाष साबणे हे तगडे उमेदवार होते. या आधी तीन वेळा ते शिवसेना आमदार राहिले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर भाजपने त्यांना इनकमींग करुन पक्षात घेतले. मूळची भाजपची मते आणि अनेक वर्षे शिवसेनेत असल्यामुळे शिवसेनेचीही मते मोठ्या प्रमाणावर साबणे खेचून आणू शकतील, असे पक्षनेत्यांचे गणीत होते. प्रत्यक्षात मात्र तसे घडलेच नाही. जितेश रावसाहेब अंतापूरकर यांनी 40 हजारांहून अधिक मतांनी सुभाष साबणे यांचा पराभव केला. महत्त्वाचे म्हणजे साबणे यांच्या तुलनेत अंतापूरकर बरेच नवखे उमेदवार होते. (हेही वाचा, Deglur-Biloli Assembly By-election: भाजपला आघाडी द्या, गाव जेवण देईन, चंद्रकात पाटील यांची ऑफर)

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुक निकाल (उमेदवारनिहाय)

  • जितेश रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस)- 1, 08, 789
  • सुभाष पिराजीराव साबणे (भाजप)- 66, 872
  • उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी)- 11, 347
  • मारुती लक्ष्मण सोनकांबळे (अपक्ष)- 465

देगलूर (राखीव) विधानसभा मतदार संघातील ही पोट निवडणूक चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस या भाजप नेत्यांनी प्रतिष्ठेची केली होती. भाजपचे अनेक नेते इथे प्रचारालाही गेले होते. मतदारांवर मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही. पंढरपूर विधानसभा निवडणूक पोटनिवडणुकीप्रमाणे ही जागाही आपण भाजपकडे खेचू असे फडणवीस आणि भाजपच्या धुरीणांचे गणीत होते. पण ते गणिति फसले. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यासह रावसाहेब दानवे, भागवत कराड आणि आशिष शेलार यांनी देगलुर बिलोली येथे प्रचारासाठी हजेरी लावली होती. प्रचाराची संपूर्ण जबाबदारी नांदेडचे खासदार प्रताप पीटील चिखलीकर यांच्या खांद्यावर होती.