Nanded Shocker: आईनेच पोटच्या मुलाच्या खूनासाठी भाडेकरूंना दिले 50 हजार रूपये; तिघांना अटक
Representational Image (Photo Credits: Facebook)

नांदेड पोलिसांनी (Nanded Police) 55 वर्षीय महिला आणि तिच्या सोबत 2 अन्य लोकांना खूनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. या महिलेवर तिच्याच मुलाचा खून केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 वर्षीय सुशील श्रीमंगले याचा मृतदेह 14 ऑगस्टला बारड धरण परिसरामध्ये आढळला. पोलिसांनी त्याचा मृत्यू खूनामुळे झाल्याचं नोंदवलं आहे. दरम्यान बारड पासून 20 किमी अंतरावर असलेल्या गीता नगर भागात सुशिल राहत होता. पोलिस तपासामध्ये सुशीलची आई शोभाबाई चं वागणं त्यांना संशयास्पद वाटलं.

पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासलं तेव्हा त्यांना सुशील कुटुंबातील दोन भाडेकरूंसोबत मद्यपान करताना दिसला. पुढे ते बारडच्या दिशेला गेले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. या भाडेकरूंनी सुशिलच्या आईच्या सांगण्यावरूनच त्याचा खून केला असल्याची कबूली पोलिसांना दिली. नंतर सुशिलची आई शोभाबाई ने देखील भाडेकरूंना मुलाच्या खूनासाठी 50 हजार रूपये दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी नंतर शोभाबाई आणि राजेश पाटील (29) आणि विशाल भगत (26) यांना बेड्या ठोकल्या आहेत. राजेश आणि विशाल कामगार म्हणून काम करत होते. कोर्टात त्यांना गुरूवारी (18 ऑगस्ट) दाखल केल्यानंतर पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे देखील नक्की वाचा: Nagpur: भूतबाधा झाल्याचा संशय, पोटच्या मुलीला जीव जाईपर्यंत अमानुष मारहाण, नागपूर येथील आई-वडीलांचे क्रुर कृत्य.

नांदेडचे स्थानिक पोलिस आणि बारड पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त प्रयत्नाने या खूनाचा छडा लावण्यात यश आले आहे. दारुच्या व्यसनापायी पैशांची मागणी करत मुलगा सुशील कायम आई-वडिलांना मारहाण करत होता. त्याच्या या वागण्याला कंटाळून आईनेच पोटच्या गोळ्याचा खून करण्यासाठी दिलेली सुपारी धक्कादायक आहे. सुशिलचा खून गळा आवळून झाल्याचं त्याच्या ऑटोप्सी रिपोर्ट मधून समोर आलं आहे.