Bhut-Badha | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भूतबाधा (Bhut-Badha) झाल्याच्या संशयातून अघोरी उपाय करण्याच्या नादात नागपूर (Nagpur) येथील सहा वर्षीय चिमुकलीचा (Little Girl Death) जीव गेला आहे. धक्कादायक असे की, भोंदू बाबाच्या नादी लागून आई-वडील आणि मावशीने केलेल्या मारहाणीत या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या तिघांनी मिळून शुक्रवार आणि शनिवारी रात्री चिमूकलीला लाथाबुक्या आणि पठ्ठ्याने मारहाण केली. हा मार सहन न झाल्याने तो कोवळा जीव निपचीत पडला आणि त्यातच त्याचा प्राण गेला. या विचित्र प्रकारामुळे नागपूर हादरुन गेले आहे. नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) घटनेची दखल तातडीने घेऊन मुलीचे वडील सिद्धार्थ चिमणे, आई रंजना आणि मावशी प्रिया बनसोड यांना अटक केली आहे. आई वडीलांनीच हे कृत्य केल्याने विश्वास तरी कोणावर आणि कसा ठेवायचा? असा संतप्त सवाल समाजातून विचारला जात आहे.

सिद्धार्ध चिमणे हा पीडित मुलीचा वडील युट्युबवर स्थानिक वृत्तवाहिनी चालवतो. नुकत्या झालेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त सिद्धार्ध हा आपली पत्नी आणि दोन मुलींना घेऊन दर्गामध्ये गेला होता. दर्गामध्ये गेल्यापासूनच आपल्या मुलीच्या वर्तनात लक्ष्यनीय बदल झाला आहे. तिला भूतबाधा झाली आहे. ती तातडीने दुर करायला हवी या गैरसमजातून त्याने काळी जादू करण्याचे ठरवले. त्यातूनच त्याने हे कृत्य केल्याची माहिती नागपूरमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. (हेही वाचा, Sangamner: धक्कादायक! भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली महिलेवर अत्याचार, एका मांत्रिकाला अटक)

पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, मुलीचे आई, वडील, मावशी या लोकांनी मिळून काळी जादू केली. या विचित्र आणि अघोरी प्रकाराचा व्हिडिओही बनवला. व्हिडिओत पाहायला मिळते आहे की, सहा वर्षांच्या त्या चिमूकलीला वडील काही प्रश्न विचारत आहेत. ते प्रश्न मुलीला काहीच कळत नव्हते. त्यामुळे ती शांत बसून राहात होती. काहीच उत्तरे देत नव्हती, असे पोलीस म्हणाले.

ट्विट

मुलीवर काळी जादू करत असताना या तिघांनी अनेकदा मुलीच्या कानाखाली मारल्या. यात ती बेशुद्ध झाली आणि खाली पडली. तरीही ते तिला मारतच होते. पुढे या तिघानी या मुलीला दर्ग्यात नेण्यात आले. ती शुद्धवर येत नसल्याचे पाहून ते तिला सरकारी रुग्णालयात घेऊन आले. सरकारी रुग्णालयात दाखल करुन या तिघांनीही तेथून पळ काढला. या तिघांच्याही हालचाली संशयास्पद होत्या. त्यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षारक्षांने त्यांच्या गाडीचा फोटो काढला होता. त्यावरु पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली आणि त्यांना ताब्यात घेतले.