काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना जोरदार धक्का दिला आहे. नाना पटोले यांनी अहमदनगर काँग्रेस (Ahmednagar Congress) जिल्हा कार्यकारिणी बर्खास्त केली आहे. काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांनी दिलेला पक्षाचा राजीनामा आणि तत्पूर्वी पदवीधर मतदारसंघातून दाखल केलेली अपक्ष उमेदवारी यामुळे काँग्रेस पक्षात सध्या जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. पटोले यांनी केलेल्या कारवाईला या उमेदवारी आणि संघर्षाच्या राजकारणाची किनार असल्याचे समजते.
सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीनंतर सत्यजित यांच्यासह अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश उर्फ बाळासाहेब साळुंखे यांना नुकतेच निलंबीत करण्यात आले. त्यानंतर आता संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीत बर्खास्त करण्यात आली आहे.
बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. राज्य विधीमंडळातही ते सर्वात ज्येष्ठ आमदार मानले जातात. त्यांचे अहमदनगर जिल्ह्यात वर्चस्व आहे. त्यामुळे आता पटोले यांनी थेट कार्यकारिणीच बर्खास्त केल्यामुळे थोरात यांना एकप्रकारे धक्काच दिल्याचे मानले जात आहे. उल्लेखनीय असे की, नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे बाळासाहेब थोरात यांच्या नंतरच घेतली आहेत. नाना पटोले यांच्या आगोदर या पदाची सूत्रे थोरात यांच्याकडेच होती. (हेही वाचा, मेदवाराने शेवटच्या क्षणी शर्यतीतून माघार घेतल्याने नाना पटोले नाराज, म्हणाले - बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देणार नाही)
दरम्यान, सत्यजित तांबे हे काँग्रेस नेते होते. त्यांच्याकडे युवा काँग्रेसचे नेतृत्व होते. त्याहीपलिकडे म्हणजे ते बाळासाहेब थोरात यांच्ये अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत. त्यामुळे आता काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणीच बर्खास्त झाल्याने थोरात आणि तांबे गटाला आपल्या मनवर्जीने वागण्यासाठी उलट रानच मोकळे झाले, अशीही चर्चा अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात सुरु झाली आहे. दरम्यान, सत्यजित तांबे यांना पक्षातून निलंबीत केल्यावर तीव्र प्रतिक्रिया आली होती. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे तर दिलेच होते. शिवाय पदाचे राजीनामे न देताही सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला होता. ही पक्षाच्या भूमिकेच्या विरुद्ध भूमिका होती. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसचे राजकारण काय वळण घेते याबाबत उत्सुकता आहे.