Nana Patole's Letter To Mallikarjun Kharge: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून मला पदमुक्त करा, अशा आशयाचे पत्र आपल्या वरिष्ठांना लिहिले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी मध्ये रस्सीखेच सुरू असतानाच काँग्रेस चांगली भरारी घेईल असे वाटत होते. परंतु, जनतेसमोर काँग्रेसने पक्ष फोडाफोडीचे, महायुती मधील राजकारणाचे अनेक मुद्दे मांडून देखील महायुतीला बहुमताचा आकडा सहज पूर्ण करता आला.
काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला असल्याने अंतर्गत गटबाजी त्याचप्रमाणे लोकांपर्यंत नाना पटोले यांच्याबाबत असलेल्या स्पष्ट स्वभावाच्या काही गोष्टी मान्य नसल्याने काँग्रेसच्या अनेक नेते व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. म्हणूनच काँग्रेसमधील एक गट नाना पटोले यांना पदमुक्त करण्याबाबत आग्रही असताना दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतःहूनच विधानसभेतील पराभवानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (हेही वाचा - Nana Patole Resigns As Maharashtra Congress Chief: काँग्रेसला मोठा धक्का! विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नाना पटोलेंनी दिला महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा)
नाना पटोले यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून मला मुक्त करा असे पत्राद्वारे कळवले आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना या विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात त्याचप्रमाणे, संग्राम थोपटे तसेच विदर्भातील अनेक बड्या नेत्यांना निवडणुकीत आपले अस्तित्व टिकविता आले नाही. त्यामुळेच काँग्रेसमध्ये एक मरगळ आलेली दिसते आहे. यातून नवीन चेहरा प्रदेशाध्यक्ष म्हणून दिल्यास स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिका निवडणुकांमध्ये पक्ष बांधणी करून निवडणुकांना सामोरे जाता येईल, असे काँग्रेस मधील काही नेत्यांना वाटत आहे. (हेही वाचा - Maharashtra Election Results 2024: नाना पटोलेंपासून रोहित पवारांपर्यंत सर्वात कमी फरकाने विजयी झालेल्या प्रतिष्ठित आमदारांची यादी)
दरम्यान, नाना पटोले यांच्या या निर्णयामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि वरिष्ठ नेते नाना पटोले यांची मनधरणी करतात की, महाराष्ट्राला प्रदेशाध्यक्ष म्हणून नवा चेहरा देतात हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.