नालासोपाऱ्यात एसटी स्टॅण्ड बंद केल्याने प्रवाशांची रेल्वे स्थानकावर गर्दी; लोकलने प्रवास करण्याची केली मागणी
Nalasopara Railway Station (PC - Twitter)

आज सकाळी नालासोपाऱ्यात (Nalasopara) एसटी स्टॅण्ड बंद केल्याने प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर (Nalasopara Railway Station) गर्दी केली होती. यावेळी प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरुन ट्रेन रोखण्याचा प्रयत्नदेखील केला. या प्रवाशांकडून लोकलने प्रवास करण्याची मागणी केली जात आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे मुंबईत केवळ अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठीचं विशेष लोकल रेल्वे सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.

सर्व सामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सुरु नसल्याने अत्यावश्यक सेवेसाठी सुरु असणाऱ्या लोकलमध्ये प्रवेश देण्यात यावा किंवा प्रवाशांसाठी इतर लोकल सुरु करण्यात यावी, अशी मागणी करत नालासोपारा येथे संतप्त नागरिकांनी आज लोकल रोखून धरली. यावेळी अनेक प्रवासी रुळावर उतरले होते. त्यामुळे रेल्वे स्थानकात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात आले. (हेही वाचा - Rajyasabha MP Oath Ceremony: शरद पवार, रामदास आठवले, छत्रपती उदयनराजे भोसले, राजीव सातव आदी नेते घेणार खासदारकीची शपथ)

आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अनेक प्रवाशांनी रेल्वे स्थानकात गर्दी केली होती. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या लोकलमध्ये या प्रवाशांना घेण्यात आलं नाही. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरत रेल्वेतून प्रवास करण्याची मागणी करत रेल्वे रोखून धरली. यावेळी प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार या प्रवाशांसाठी रेल्वे सेवा सुरू करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.