
नालासोपारा (Nalasopara) मध्ये पोलिसांच्या जाचाला कंटाळून एका बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. जयप्रकाश चौहान (Jaiprakash Chauhan) असं या बिल्डरचं नाव असून त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचं समोर आलं आहे. या चिठ्ठीत शाम शिंदे आणि राजेश महाजन या पोलिस कर्मचार्यांना त्यांनी मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. नालासोपारा मध्ये जयप्रकाश यांनी ओम श्री दर्शन ही इमारत पुनर्विकासासाठी घेतली होती. त्या बांधकामासाठी पोलिस शिपाई शाम शिंदे याने त्याच्या नातलगाच्या माध्यमातून 50 लाखांचे फायनान्स केलं होतं. एका वर्षात दुप्पट रक्कमेच्या आश्वासनावर त्याने पैसे दिले होते. तसेच जामीन म्हणून चार फ्लॅटचा ताबाही लिहून घेतला होता.
इमारत बांधकामाला एक वर्षापेक्षा जास्त वेळ झाल्याने पोलिस शिपाई शाम शिंदे आणि त्याचा सहकारी राजेश महाजन तसेच मध्यस्थ लाला लजपत यांनी जयप्रकाश चौहान यांच्याकडे पैशाच्या मागणीचा तगादा लावला होता. जयप्रकाश यांनी 22 लाख ॲानलाईन आणि 10 लाख रोख रक्कम असे मिळून 32 लाख शाम शिंदेला दिल्याचं नातेवाईक आणि मित्रांनी सांगितलं. मात्र तरीही शाम शिंदे आणि त्याचा सहकारी महाजनने जयप्रकाश यांना पैशासाठी त्रास दिला. ती बिल्डिंग आता आमची आहे, तू सोडून जा, अन्यथा खोट्या गुन्ह्यांत अडकवणार अशी धमकी शाम शिंदे याने दिल्याचा दावा चौहान कुटुंबीयांनी केला. शाम शिंदेच्या त्रासाला कंटाळून जयप्रकाश चौहान यांनी अखेर मुलाच्या घरी पंख्याला लटकून आत्महत्या केली. नक्की वाचा: Navi Mumbai Firing Incident: नवी मुंबई मध्ये महिनाभरात बिल्डरवर गोळीबारीची दुसरी घटना; सुदैवाने बचावली महिला बांधकाम व्यावसायिक.
शाम शिंदे आणि त्याचा सहकारी राजेश महाजन, तसेच मध्यस्थी करणार्या लाला लजपत यांच्यावर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी चौहान कुटुंबीयांनी आता केली आहे.