Navi Mumbai Firing Incident: नवी मुंबई मध्ये महिनाभरात बिल्डरवर गोळीबारीची दुसरी घटना; सुदैवाने बचावली महिला बांधकाम व्यावसायिक
Gun Shot | Pixabay.com

नवी मुंबई (Navi Mumbai) मध्ये महिन्याभरात पुन्हा एकदा बांधकाम व्यावसायिकावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पनवेल (panvel) मध्ये बांधकाम आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय करणार्‍या एका महिलेवर गोळीबार झाला आहे. सुदैवाने या घटनेत त्या महिलेचा जीव वाचला आहे. बांधकाम व्यावसायिक असलेल्या या महिलेच्या पायाला गोळी लागली असल्याने जीवावर धोका टळला आहे. स्नेहल पाटील (Snehal Patil) असं या महिलेचं नाव आहे. पायाला गोळी लागल्यानंतर तिला नेरूळ (Nerul) मधील अपोलो रूग्णालयामध्ये (Apollo Hospital) दाखल करण्यात आले आहे.

व्यावसायिक वादामधून हा गोळीबार झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पनवेल शहर पोलिस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

नवी मुंबईत 15 मार्चला नेरूळ मध्ये सेक्टर 6च्या अपना बाजार परिसरामध्ये दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना समोर आली होती. सावजी भाई पटेल या बांधकाम व्यावसायिकावर हा गोळीबार झाला होता. अंबिका दर्शन सोसायटीमध्ये जात असताना दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला होता त्यामध्येच त्यांचा मृत्यू देखील झाला होता. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकांची स्थापना केली होती. नक्की वाचा: Navi Mumbai Shooting: नेरूळ मध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, बांधकाम व्यावसायिकाचा जागीच मृत्यू.

नवी मुंबई यापूर्वी अनेकदा अशाप्रकारे बांधकाम व्यावसायिकांच्या हत्यांच्या प्रकरणांनी हादरली आहे. बांधकाम व्यावसायिकांना खंडणी वसूलीची भीती आहे. काही गुंडाच्या टोळ्या सक्रिय आहेत, ज्यांच्याकडून या व्यावसायिकांना वसुलीची भीती आहे.