जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे भारत-पाक सीमेवर नगरचे जवान सुनील वाल्टे शहीद
Naib Subedar Sunil Valte | (Photo Credits-Twitter)

पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबरास चोख प्रत्युत्तर देताना महाराष्ट्राचा सुपूत्र सुनील वाल्टे (Sunil Valte) हे शहीद झाले. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात असलेल्या दहीगाव येथील रहीवासी असलेले सुनील रावसाहेब वाल्टे हे जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) राज्यातील राजौरी येथे कर्तव्य बजावत होते. या वेळी महाराष्ट्राचा 40 वर्षांचा हा सुपुत्र लष्करात नायब सुभेदार ((Naib Subedar ) पदावर कार्यरत होता.

उल्लेखनीय असे की, वाल्टे यांचा लष्करातील सेवाकाळ संपला होता. मात्र, वाल्टे यांनी आपल्या सेवाकाळाची मुदत वाढवून घेतली होती. त्यांचा वाढवून घेतलेला सेवाकाळही समाप्त होत आला होता. मात्र, या सेवाकाळाच्या अंतिम काळात ते शहीद झाले. वाल्टे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. (हेही वाचा, शहीद जवानांच्या विधवा पत्नींना मिळणार 50 टक्के किमतीमध्ये फ्लॅट; ST-SC लोकांसाठीही योजना लागू)

ट्विट

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वाल्टे यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी म्हणजेच दहीगाव येथे झाले. पुणे इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वाल्टे हे देशसेवेसाठी लष्करात भर्ती झाले. लष्करातील सेवाकाळात वाल्टे यांनी देशभरातील विविध ठिकाणी कर्तव्य बजावले. त्याचे काम पाहून नुकतीच त्यांना नायब सुभेदार पदावर बढती मिळाली होती. पाकिस्तानसोबत झालेल्या गोळीबारात वाल्टे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही.