नागपूर (Nagpur) मधील काटोळ (Katol) शहरात एका बँकेच्या एटीएम (ATM) वर चोरांनी डल्ला मारल्याचे समजत आहे. या चोरांनी चक्क एटीएम मशीनच पळवून नेट त्यातील 16 लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी पोलिसांनाच तपास सुरु असून अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही चोरी रविवारी म्हणजेच 13 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 2 ते 4 वाजताच्या सुमारास घडली असावी. चोरांनी आपला प्लॅन हा अगदी व्यवस्थितरित्या आखला होता, ज्यानुसार, एटीएम मध्ये शिरताच सुरुवातीलाच त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर तोडून टाकले. साहजिकच त्यामुळे ही चोरी नेमकी केली कोणी याबाबत अतिशय अस्पष्टता आहे.
यासंदर्भात तपास करत असताना पोलिसांना असे आढळले की, चोरांनी कॅमेरा तोडताच एटीएम बँकेच्या सर्व्हर पासून वेगळे केले. त्यानंतर मशीन फोडून त्यातील पैसे घेऊन जाण्याचा त्यांचा प्लॅन होता मात्र हे शक्य न झाल्याने संपूर्ण मशीनचा उचलून या चोरटयांनी पळ काढला. आश्चर्य म्हणजे यावेळी एटीएमच्या जवळ रक्षणासाठी कोणताही सुरक्षारक्षक उपस्थित नव्हता. या सर्व अज्ञात गुन्हेगारांवर पोलिसांनी भारतीय दंडसंहितेच्या कलम 457 व कलम 380 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
धक्कादायक! चोरट्यांनी पळवलं बँक ऑफ महाराष्ट्र चं ATM; पुणे - नाशिक महामार्गावर गुंजाळवाडी येथील घटना
दरम्यान, या आधी सुद्धा अहमदनगर मध्ये अशाच प्रकारच्या घटना घडल्याचे समोर आले होते. संगमनेर येथील गुंजाळवाडी परिसरात असणारी बँक ऑफ महाराष्ट् बँकेचे एटीम फोडून चोरांनी तब्बल 17 लाख रुपये लंपास केले होते, तर या घटनेच्या काहीच दिवस आधी नाशिक येथील मुत्थुट फायनांचा कार्यलयावर देखील गुंडानी सशस्त्र हल्ला करून मोठा ऐवज चोरला होता. या सर्व प्रकरणांनुसार बँकेतील खातेधाऱ्यांच्या पैशाची सुरक्षा करताना हलगर्जीपणा होत आहे का? असा सवाल सामान्यांकडून केला जात आहे.