प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

भूतबाधा उतरविण्याच्या बहाण्याने एका भोंदूबाबने एकाच कुटुंबातील चौघींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. ही घटना नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील पारडी (Pardi) परिसरात घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पारडी पोलिसांनी आरोपी भोंदूबाबाला अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपीने याआधीही अन्य कोणत्या महिलेवर अत्याचार केले आहेत का? याचाही शोध घेतला जात आहे.

धमेंद्र निनावे उर्फ दुलेवाले असे नराधमाचे नाव आहे. आरोपी हा पीडित मुलीच्या वडिलांचा मित्र असून तो दोन वर्षांपासून त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात होता. तो गेल्या काही महिन्यांपूर्वी पीडिताच्या घरी आला होता. त्यावेळी 'तुमच्या घरात भूतबाधा झाली आहे. मोठे संकट येणार आहे. वेळीच पूजा न केल्यास भूत अनेकांचा बळी घेईल, अशी त्याने भीती दाखवली होती. तसेच हे संकट टाळण्यासाठी तुम्हाला पूजा करावी लागणार असल्याचा सल्लाही त्याने दिला. त्यानंतर या भोंदूबाबाने भूत उतरविण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला घरी घेवून गेला आणि सलग दोन महिने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी भोंदूबाबने भूतबाधा उतरविण्याचे बहाण्याने पीडित मुलीसह तिची आई, आजी आणि मामीवरही अत्याचार केल्याचे पोलीस चौकशीतून उघड झाले आहे. या प्रकरणी पारडी पोलिसांनी नराधम भोंदूबाबाला अटक केली आहे. हे देखील वाचा- Parli: खळबळजनक! परळीतील उड्डाणपुलावरून एका पोलीस कर्मचाऱ्याने मारली उडी; उपचार सुरु

यापूर्वी गुप्त धन मिळवून देतो, पुत्रप्राप्ती होईल, अशी आश्वासने देत एका भोंदूबाबाने एकाच कुटुंबातील पाच बहिणींवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली होती. ही घटना गेल्या काही महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड येथे घडली होती. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी संबंधित भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली होती.