Parli: खळबळजनक! परळीतील उड्डाणपुलावरून एका पोलीस कर्मचाऱ्याने मारली उडी; उपचार सुरु
प्रतीकात्मक फोटो | (PTI photo)

बीडच्या (Beed) परळीतील (Parli) उड्डाणपुलावरून एका पोलीस कर्मचाऱ्याने उडी मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही खळबळजनक घटना आज (18 जानेवारी) 8.15 वाजताच्या सुमारास घडली आहे. यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून जवळच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या कर्मचाऱ्याने उडी का मारली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहे.

सुनील घोळवे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. घोळवे हे संभाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. दरम्यान, घोळवे हे सोमवारी रात्री दुचाकीवरून जात असताना त्यांनी शहरातील उड्डाणपुलावरून बाईक थांबवली. त्यानंतर त्याच उड्डाणपुलावरून त्यांनी खाली उडी मारली. यात घोळवे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना लातूरच्या एका रुग्णालयात हालवण्यात आले आहे. हे देखील वाचा- Mumbai: मुंबईत नायलॉनच्या मांजामुळे एका पोलीस अधिकाऱ्याचा कापला गळा; थोडक्यात बचावले

याआधी नालासोपाऱ्यातील तुळींज पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सखाराम भोये यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांनी वरिष्ठ पोलीस दालनातच स्वत:ला गोळी घातली होती. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

महाराष्ट्रात गेल्या 4 वर्षांत पोलीस दलातील तब्बल 129 जणांनी आपले आयुष्य संपवल्याचे समोर आले आहे. यामध्ये शिपायांपासून अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कौटुंबिक समस्या, आजारपण, ताणतणाव यांसह वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या करण्याच्या घटना अधिक आहेत.