राज्यात कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) ओसरत असल्याने निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 15 ऑगस्टपासून अनलॉकचे नवे नियम लागू होणार आहेत. यातच आता नागपूरकरांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोविड-19 लसीचे दोन्ही डोस (Covid-19 Vaccine Two Doses) घेतलेल्या नागरिकांना नागपूर मेट्रोने (Nagpur Metro) प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने सूचना जाही केली आहे. मात्र मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याचा पुरावा सादर करणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.
15 ऑगस्टपासून लसीकरण पूर्ण झालेल्यांना लोकल आणि मेट्रो प्रवासाची परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. याच निर्णयानुसार महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने सूचना जारी केल्या आहेत. (Maharashtra Lockdown: महाराष्ट्रातील निर्बंध रविवारपासून शिथिल होणार, काय राहणार सुरु आणि काय बंद? घ्या जाणून)
कोविड-19 लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले नागरिक मेट्रो रेलने प्रवास करु शकतात. तसंच आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना देखील मेट्रो प्रवास सुरु राहणार आहे. मात्र या नागरिकांना लस घेतल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे. नागपूरमध्ये उद्यापासून महा मेट्रोच्या अॅक्वा आणि ऑरेंज या दोन्हीही मार्गिकांवर प्रवास सुरु होणार आहे.
दरम्यान, लोकल, मेट्रो प्रवासासाठी मुभा देण्यात आली असली तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, गर्दी करु नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.