नागपूर: कोरोनामुळे नव्हे तर संसर्गाच्या भीतीने गेला जीव; विष प्यायलेल्या तरुणाला हॉस्पिटल मध्ये न्यायला उशीर केल्याने मृत्यू
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

कोरोनामुळे (Coronavirus)  महाराष्ट्रात आज पहिला बळी गेला, एका 64 वर्षीय वृद्धाचे आज मुंबईत निधन झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात सर्वत्र भीतीची वातावरण पाहायला मिळतेय. यात दुर्दैव असे की नागपूर  (Nagpur)  मध्ये एका तरुणाचा कोरोनामुळे नव्हे तर कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीनेच जीव गेला आहे. झालं असं की, जुनी मंगळवारी परिसरातील प्रमोद बुट्टे नामक एका तरुणाने वैयक्तिक कारणातून 14 मार्च रोजी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, सुदैवाने विष घेतल्यावर त्याच्या पत्नीला याबाबत समजले, त्यावेळी प्रमोद जिवंत होता म्हणजेच वेळेत त्याला रुग्णालयात नेले असते तर कदाचित त्याचे प्राण वाचवता सुद्धा आले असते, मात्र रुग्णालयात कोरोनाचे संसर्गित रुग्ण आहेत आणि जर का आपण रुग्णालयात गेलो तर हाच संसर्ग आपल्याला सुद्धा होईल या भीतीने शेजारी पाजारी, मित्र मंडळी सर्वानी प्रमोदला रुगालयात नेण्यास नकार दिला परिणामी उपचार मिळाले नाहीत म्हणून प्रमोदचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus: कोरोनामुळे भक्तांना मंदिरात प्रवेश नाही! आता देहूचे तुकोबा तर, आळंदी येथील माऊली मंदिर 31 मार्च पर्यंत राहणार बंद

ABP च्या माहितीनुसार, नागपुर मधील मायो रुग्णालय हे मंगळवारी परिसरापासून जवळच्याच अंतरावर आहे, या रुग्णालायात प्रमोदला नेण्यात यावे यासाठी त्याच्या पत्नीने सर्वांना विनंती केली होती,मात्र मायो या रुग्णालयात अनेक कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत त्यामुळे या भागात जाण्यासही अनेक जण घाबरतात. अशावेळी प्रमोदला घेऊन रुग्णालयात जाणे ही तर सर्वांसाठी विषाची परीक्षा घेतल्या सारखी परिस्थिती झाली होती,म्हणून सर्वांनी याला नकार दिला. अखेरीस खूप विनंती केल्यावर काहींनी प्रमोदला 5 वाजता हॉस्पिटल मध्ये नेले तिथे त्याच्यावर उपचार सुरु होताच त्याने आपला जीव सोडला.

दरम्यान, नागपूर मध्ये सुद्धा कोरोनाने 4 संसर्गित रुग्ण आढळले आहेत, साहजिकच यावरून भीती असणार मात्र अशावेळी नागरिकांनी आपली माणुसकी सोडू नये असे विधान नागपूर पोलिसांनी या घटनेच्या बाबत केले आहे. दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मॉल्स, मंदिरे, शाळा, कॉलेज , पर्यटन स्थळे, सरकारी कार्यालये, काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.